या ग्रामपंचायतीत भाजपचे १५, तर शिवसेनेच्या सरपंच वृषाली पाटील यांच्यासह दोन सदस्य आहेत. सरपंच पाटील यांच्याविरुद्ध उपसरपंच डॉ. अंकुश कोळेकर यांच्यासह १५ सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. डॉ. कोळेकर म्हणाले, सरपंच पाटील यांनी सदस्यांना विश्वासात न घेता केलेल्या कामांची चौकशी दोन दिवस सुरू राहणार असून, आयुक्तांनी याबाबत दखल घेतली आहे. यासाठी प्रशासनाकडून सहा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत अडीच वर्षाच्या कालावधित तब्बल चार ग्रामसेवक टिकले नाहीत. सध्या पाचवे ग्रामविकास अधिकारी उत्तमराव पाटील यांच्याकडे पदभार दिला आहे. पहिल्यांदाच आटपाडीत ग्रामपंचायतीची चौकशी लागली आहे.
गेली अडीच वर्षे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच हे सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आक्षेप उपसरपंच व सदस्यांचा असून, मासिक बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. याबाबत चौकशीचे आदेश आयुक्ताकंडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले आहेत. त्यानुसार या दोन दिवसांत सहा शासकीय अधिकारी चौकशी करणार आहेत.
यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, चार विस्तार अधिकारी अशा सहा अधिकाऱ्यांकडून चौकशी होऊन याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देणार आहेत.
कोट
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. सत्तेचा गैरवापर करून ग्रामपंचायतीची चौकशी सुरू केली आहे. यापूर्वीही दोनवेळा चौकशी केली आहे. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. आता पुन्हा ती चौकशी सुरू करण्यात आली आहे. आमचे काम पारदर्शक असल्याने कसलीच अडचण नाही.
- वृषाली पाटील
सरपंच, आटपाडी