अविनाश बाड ।आटपाडी : पिण्याच्या पाण्यासाठी आटपाडी तलावात आरक्षित केलेल्या पाणी साठ्यावर काहींनी डल्ला मारला आहे. पाणीसाठा संपत आला असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर येत्या चार दिवसात तलाव कोरडा पडून आटपाडीसह आठ गावात भीषण पाणीटंचाई भासण्याची भीती आहे.
आटपाडीसह मापटेमळा ग्रामपंचायत आणि माडगुळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून ७ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आटपाडी तलावातून केला जातो. या तलावाची पाणी साठवण क्षमता ३०७ दशलक्ष घनफूट आहे.
मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने फक्त १७८ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा झाला. तलावातून सध्या ५ ते १५ अश्वशक्ती क्षमतेच्या ७० मोटारी अहोरात्र पाणीउपसा करीत आहेत. आॅगस्ट २०१८ अखेर वार्षिक १०५ दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण ठेवण्याचा आदेश महसूल प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिला आहे. त्यानुसार सध्या तलावात किमान ५९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ४८ दशलक्ष घनफूट पाणी असून यापैकी २७ दशलक्ष घनफूट पाणी गाळात आहे. पिण्यासाठी त्याचा वापर करता येणार नाही; म्हणजेच सध्या फक्त २१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. या पाण्याचाही सध्या अहोरात्र उपसा सुरू आहे. त्यामुळे २०१३ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीत जसा तलाव कोरडा पडला होता, तसा आता होण्याची भीती आहे.जरा इकडे लक्ष द्या!सध्या आटपाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. पण तलावातील पाण्याकडे दुर्लक्ष केल्यास, निवडणुकीत कुणीही जिंकले तरी लागलेला गुलाल धुवायलाही पाणी मिळणार नाही. सध्या टेंभूचे पाणी सांगोला, कवठेमहांकाळला कालव्याने आटपाडी तालुक्यातूनच जात आहे. आधी ४० हजार रुपये दशलक्ष घनफूट असलेली पाणीपट्टी आता फक्त १४ हजार ७६१ रुपये झाली आहे. पाणी उपसा करणाऱ्या शेतकºयांकडून रक्कम काढून लगेच पाणी घेतले, तर त्यांची पिकेही वाचतील व पाणीटंचाईही भासणार नाही. ३१ मेपर्यंत टेंभूचे पाणी सुरू राहणार आहे.
ग्रामपंचायती पाण्याचे पैसेच भरत नाहीतग्रामपंचायतींना पाण्याचा दर १० हजार लिटरला दीड रुपया आहे. तरीही गेल्या दोन वर्षात एकाही ग्रामपंचायतीने पाण्याचे पैसे भरलेले नाहीत. आटपाडी ग्रामपंचायतीकडे ५ लाख ३५ हजार ८६५ रुपये, मापटेमळा ३६,१६० रुपये, तर माडगुळे प्रादेशिक योजनेच्या ७ गावांकडे १ लाख ४९ हजार ५३९ रुपये एवढी थकबाकी आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसूल नेमका जातो कुठे, असा प्रश्न आहे.