जानेवारी महिन्यामध्ये सांगलीतील कर्नाळ रोडवरील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी कारवाई करून पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना एका महिलेसह अटक केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पाेलीस निरीक्षक देवकर आणि त्यांच्या सोबत सहा जणांवर अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे त्यांनी आव्हान दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले होते. याप्रकरणी देवकर यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागून संबंधित प्रकरणात आपल्यावर चुकीची कारवाई झाली असल्याचे म्हटले होते. न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला असून त्यामध्ये पोलीस निरीक्षक देवकर आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तीला या गुन्ह्यात आरोपी करता येणार नाही, असे स्पष्ट केले.
चौकट
कारवाईचे गौडबंगाल काय?
पोलीस निरीक्षक देवकर यांच्यावर केलेली कारवाई ही पोलिसातील अंतर्गत वादातून झाल्याचा आरोप यापूर्वीच आटपाडी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र, पोलिसांनी आपल्या कारवाईचे समर्थन केले होते. आता न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सांगली जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आपल्या खात्यातील एका अधिकाऱ्याविरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यामागे नेमके गौडबंगाल तरी काय आहे? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.