अविनाश बाड -- आटपाडी -आटपाडी तालुक्यातील पावसाची आकडेवारी फुगत चालली असली तरी, प्रत्यक्षात तलावातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत नाही. तालुक्याच्या डोक्यावरून कायम ढग पळताना दिसत आहेत. या विचित्र परिस्थितीत तालुक्यात आतापर्यंत सरासरी २००.६६ मि.मी. एवढा पाऊस झाला असला तरी, तालुक्यातील नदी आणि सर्व ओढे कोरडे आहेत. ६ गावे आणि १४८ वाड्या-वस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आटपाडी तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३५५ मि.मी. एवढे आहे. तालुक्यात सप्टेंबरनंतरच परतीचा मान्सून हमखास बरसतो. यंदा मात्र पावसाने तालुक्यावर जून महिन्यापासूनच कृपा केली आहे. तालुक्यात आतापर्यंत आटपाडीत २६५ मि.मी., दिघंचीत १८६ मि.मी., तर खरसुंडीत १५५ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे. म्हणजे वर्षाच्या सरासरीएवढा पाऊस होत आला असला तरी, तालुक्यातील तापमान थंड झाल्याचे वगळता, दुष्काळी परिस्थितीत बदल झालेला नाही. सध्या तालुक्यातील ३०,४९९ लोकांना २० टॅँकरने ५०.५ खेपांनी पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात बाळेवाडी गावाला दि. १२ फेब्रुवारी रोजी पहिला टॅँकर सुरू करण्यात आला. तेव्हापासून टॅँकरची मागणी वाढत गेली. तालुक्यात एकमेव असलेल्या माणगंगा नदीसह तालुक्यातील सर्व ओढे कोरडे आहेत, तर तालुक्यातील तलावामध्ये टेंभूचे सोडलेले पाणी वगळता पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे सध्या झालेल्या पावसाचा शेतीला तर फारसा उपयोग नाहीच, उलट ढगाळ हवामानामुळे डाळिंबावर कीड रोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंबावरील कीटकनाशकांच्या फवारण्या वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. ओढे-नाले न राहिल्याने भूजल पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाच्या आकडेवारीने कागदावर दुष्काळ हटल्याचे चित्र निर्माण होत आहे. प्रत्यक्षात मात्र तालुका भीषण दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. याकडे राज्यकर्त्यांसह जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
आटपाडी तालुक्यावर पाऊस रुसलेलाच
By admin | Published: August 05, 2016 1:03 AM