सांगली : आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सुतगिरणींची विक्री करताना जिल्हा बँकेने खरेदीदार कंपनीला शासकीय व अन्य देणी देण्याची अट घातली होती. मात्र संबंधित कंपनीने ही अट पाळली नाही. त्यामुळे सुतगिरणीचा फेर ताबा का घेऊ नये? अशी विचारणा करणारी नोटीस संबंधित कंपनीला पाठवली आहे. तसेच तातडीने ठरल्याप्रमाणे सुतगिरणीवरील अन्य देणी फेडण्याची सूचना केली आहे, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.देशमुख सुतगिरणीवर जिल्हा बँकेसह शासकीय व कर्मचाऱ्यांची देणी ४० कोटी होती. जिल्हा बँकेने लिलाव करताना १४ कोटींची थकबाकी भरून घेत सदरची सुतगिरणी देशमुख इंडस्ट्रिज कंपनीला विकली. कंपनीसोबत विक्री व्यवहार करताना बँकेने जिल्हा बँके व्यतिरिक्त सुतगिरणीवरील शासकीय व अन्य देणी खरेदीदार कंपनीने भागवावीत अशी अट घातली. देशमुख सुतगिरणीवर जिल्हा बँकेचे १४ कोटी तसेच वस्त्रोद्योग मंडळाच्या माध्यमातून शासनाने दिलेले २४ कोटींचे भागभांडवल व अन्य देणी होती. पण बँकेने वस्त्रोद्योग मंडळ, कंपनीच्या देण्याची जबाबदारी न स्वीकारता कर्ज वसूल करून अन्य देणी देण्याची जबाबदारी कंपनीवर टाकली. कंपनीने ही देणी दिली नसल्यामुळे वस्त्रोद्योग मंडळाने गंभीर दखल घेत जिल्हा बँकेच्या विरोधात सहकार आयुक्तांकडे तक्रारी केली. देशमुख सुतगिरणीच्या विक्री व्यवहारात जिल्हा बँकेने शासन तसेच सुतगिरणीच्या सभासदांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला. व्यवहाराची चौकशी करून पुन्हा सुतगिरणी ताब्यात घेण्याची विनंती मंडळाने सहकार आयुक्तांकडे केली होती.सहकारी आयुक्तांनी सध्या जिल्हा बँकेच्या कारभाराची चौकशी करत असलेल्या पथकाला देशमुख सुतगिरणीच्या विक्रीची तसेच वस्त्रोद्योग मंडळाने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान जिल्हा बँकेच्या संचालकांमध्ये वादळी चर्चा झाली. या प्रकरणी संचालक अडचणीत येण्याची शक्यता असल्याने सुतगिरणी पुन्हा ताब्यात घेण्याची मागणी संचालकांनी केली. बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी कायदेशीर अभिप्राय घेऊन कारवाई होईल असे सांगितले.
दोन महिन्यात १२० कर्जदारांवर कारवाई
जिल्हा बँकेने मार्च अखेर बँकेचा ढोबळ एनपीए १० टक्केपेक्षा कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. मोठ्या सहकारी संस्थांवर सिक्युरिटायझेशन ॲक्टनुसार कारवाई झाली आहे. गेल्या दोन महिन्यात १२० व्यापारी, उद्योजक व अन्य कर्जदारांवर सिक्युरिटायझेशन ॲक्टनुसार कारवाई केली आहे. कलम १०१ च्या कारवाईही सुरू आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली