आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाऊसाहेब गायकवाड सांगतात की, मुळात डाळिंबावर संशोधनापेक्षा त्याचे उत्पादन कसे वाढविता येईल, यासाठी तालुक्यात अनेक प्रयोग झाले. जगभरातील देशांत डाळिंबाला मागणी असली तरी प्रत्येक देशाकडून मागणी वेगवेगळी असते. युरोपीय खंडात लागणाऱ्या डाळिंबाचा आकार मोठा असतो, तर आखाती देशात त्यापेक्षा कमी आकाराच्या डाळिंबांना मागणी असते. त्यामुळे व्यापारी सांगतील त्या आकारात डाळिंब उत्पादित करण्याची किमया आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी साधली आहे.
सध्या कृषी क्षेत्रातील अनेक अभ्यासक आवर्जून आटपाडीला भेट देऊन शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षांसाठी सुरू केलेल्या प्रयोगांचा अभ्यासही त्यांनी सुरू केला आहे.
सध्या या भागात समाधानकारक पाण्याची उपलब्धता झाल्याने डाळिंबाचे क्षेत्र अजूनच बहरत आहे. सध्या १५ हजार हेक्टरवर डाळिंबाचे क्षेत्र असून, प्रसंगी टँकरने पाणी आणून शेतकऱ्यांनी डाळिंब बागा जगविल्या आहेत. आटपाडीतच होणारे डाळिंबाचे सौदे, जगभरातून असलेली मागणी लक्षात घेता, भविष्यात डाळिंबाचे दर ठरविण्याचा अधिकार आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे येईल इतक्या मोठ्याप्रमाणात डाळिंब उत्पादन वाढत आहे.
- शरद जाधव