आटपाडी : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व त्यांचे बंधू ब्रह्मानंद यांनी जमिनीच्या व्यवहारात आणि शेतीसाठी घेतलेल्या पाण्याचा माेबदला न देता झरे (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्याची १४ लाख ७५ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणूक व ॲट्राॅसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी महादेव आण्णा वाघमारे (वय ७७) यांनी आटपाडी पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
वाघमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, महादेव वाघमारे, त्यांचा भाऊ विश्वास, बहीण शांताबाई कदम, मृत बहीण वनिता खरात हिच्या मुली मंजुश्री खरात, मनीषा सोनावणे, मुलगा धनंजय खरात यांच्या मालकीची झरे हद्दीत २६ गुंठे जमीन आहे. विधान परिषदेचे आमदार गाेपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांनी महादेव वाघमारे यांच्याकडून ती जमीन कुलमुखत्यारपत्राच्या आधारे २१ मार्च २०११ रोजी खरेदी केली.
त्यापूर्वी २००८ मध्ये झालेल्या तोंडी व्यवहारात दहा लाख पन्नास हजारात व्यवहार ठरला हाेता. तेव्हा पडळकर बंधूंनी वाघमारे यांना एक लाख रुपये दिले. २०११ मध्ये खरेदी करत असताना मुद्रांक शुल्क चुकविण्यासाठी जमिनीची किंमत कमी दाखविली. प्रत्यक्षात वेळोवेळी चार लाख व दस्तावेळी ७५ हजार, असे एकूण पाच लाख ७५ हजार रुपये दिले. त्यानंतर उर्वरित ४ लाख ७५ हजार रुपये दिलेले नाहीत.
याशिवाय १२ एकर क्षेत्रासाठी पडळकर बंधू वाघमारे यांच्या विहिरीतील पाणी काेणताही माेबदला न देता वापरत आहेत. या पाण्यासाठी वर्षाला एक लाख रुपये यानुसार दहा लाख देणे बाकी आहे. ते व जमीन व्यवहारातील ४ लाख ७५ हजार अशी एकूण १४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक पडळकर बंधूंनी केल्याचे वाघमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार दोघांवर फसवणूक व अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्राॅसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.