फोटो ओळ : संख (ता. जत) डाळिंब बागांवरील फुलकळीवर अटॅक रोगाचे पांढऱ्या रंगाचे डाग पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : वातावरणातील बदलाने जत तालुक्यातील डाळिंबावर बिब्या, करपा, मर रोगांपाठोपाठ आता ‘अटॅक’ या नवीन रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. फुलकळीवर पांढऱ्या रंगाचा डाग पडून चार दिवसांत फुलगळती होत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मोठा असल्याने संपूर्ण बागांची गळती झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
तालुक्यामध्ये १२ हजार २२१ एकर डाळिंबाचे क्षेत्र आहे. संख, दरीबडची, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, आसंगी, दरीकोणूर, वाळेखिंडी, काशीलिंगवाडी, बेवणूर या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला असल्याने दुष्काळी पट्ट्यात पाणीसाठा चांगला आहे. चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. मात्र बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला आहे.
सध्या डाळिंबाचा मृग बहर हंगाम आहे. उन्हाळी पावसानंतर वातावरणात आर्द्रता वाढली. बदलत्या वातावरणाचा परिणाम डाळिंबावर झाला आणि अटॅक या नवीन रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. संख, दरीबडची, सोन्याळ, जाडरबोबलाद, जालिहाळ, सिद्धनाथ, दरीकोणूर व शेजारच्या मंगळवेढा, सांगोला तालुक्यांत हा रोग दिसत आहे.
गेल्या वर्षी हा रोग फळांवर आला होता. यावर्षी फूल, फुलकळी, तर बारीक फळांवर पांढरे डाग पडले आहेत. यामुळे चार- पाच दिवसांनी फळ गळून पडते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी महागड्या औषधाचा मारा करत आहेत.
चाैकट
विकास सोसायट्या संकटात
तालुक्यातील विकास सोसायट्यांनी शेतकऱ्यांना बागांवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. बागा अडचणीत आल्याने उत्पादन घटणार आहे. वसुली थकबाकीने विकास सोसायट्या अडचणीत येणार आहेत.
कोट
यंदा बदलत्या वातावरणाचा फटका डाळिंब पिकाला बसला आहे. अटॅक, बिब्या, कुजवा, मर रोगाने ६० टक्क्यांहून अधिक नुकसान होणार आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना कर्जवसुुुलीत सवलत मिळावी.
-अप्पासाहेब चिकाटी, डाळिंब उत्पादक, दरीबडची