सांगली - राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालणारा केंद्राचा प्रमुख राजकिशोर शिंदे याला पकडण्यात पोलिस दिरंगाई करीत असल्याने फसगत झालेल्या लोकांनी शनिवारी या केंद्रावर हल्लाबोल केला. केंद्राचे कुलूप तोडून प्रवेश केला. संपूर्ण केंद्राची झाडाझडती घेतली. पण गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच संशयित शिंदे याने केंद्रातील सीसीटीव्ही कॅमे-याचा डीव्हीआर तसेच रेकॉर्ड गायब केल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्राचे प्रमुख राजकिशोर शिंदे, पत्नी विजया शिंदे व व्यवस्थापक श्रीमती देशमुख (पूर्ण नाव अजूनही निष्पन्न नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा चार दिवसापूर्वी गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी शशिकांत हुल्याळ (सीतारामनगर, सांगली), लक्ष्मण महादेव खारे (म्हैसगाव, ता. माढा), अनिल हणमंत जगदाळे (तासगाव) या तिघांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्याशिवाय आणखी सात तक्रारी दाखल झाल्या आहेत. वधू-वर सूचक केंद्र चालविणाºयाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही पहिली घटना घडली आहे. संशयितांनी वधू-वर सूचक के्रंद्राची जाहिरात केली. जाहिरात वाचून अनेकांनी त्यांना संपर्क साधला. संशयितांनी त्यांच्याकडून पैसे वसूल केले; पण प्रत्यक्षात त्यांनी कोणतेही स्थळ काढले नाही. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच संशयितांनी पलायन केले. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे शनिवारी माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, सामाजिक कार्यकर्त्या रेखा पाटील यांच्या माध्यमातून फसगत लोकांनी या केंद्राकडे धाव घेतली. पण त्याला कुलूप होते. लोकांनी कुलूप तोडून केंद्रात प्रवेश केला. हे केंद्र आपटा पोलिस चौकीजवळ आहे. केंद्रामध्ये मुला-मुलींचे मेकअपमधील फोटो भिंतीवर लावले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पण त्यामधील डीव्हीआर गायब केलेला आहे. तसेच रजिस्टर, रेकॉर्ड वहीही गायब केल्याचे उघडकीस आले आहे. तेवढ्यात राजकिशोर शिंदेचा मुलगा आला. त्याला लोकांनी चांगलेच धारेवर धरले.पोलिसप्रमुखांकडे धावआपटा पोलिस चौकीजवळ शिव आर्नेट अपार्टमेंटमध्ये हे केंद्र आहे. तेथील रहिवाशांनीही शनिवारी सायंकाळी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांची भेट घेऊन या केंद्रात वधू-वर सूचक मंडळाच्या नावाखाली भलताच व्यवसाय चालत असल्याचा आरोप केला. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी सामााजिक कार्यकर्त्या रेखा पाटील यांच्यासह संदीप सकळे, विपूल देडिया, मनोज कुलकर्णी, प्रकाश मगर उपस्थित होते.
सांगलीतील राजकिशोर वधू-वर केंद्रावर हल्लाबोल, फसलेले तरूण आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 12:14 PM