आटपाडी : आटपाडी तालुक्यामध्ये अवैध वाळू तस्करी राेखण्यासाठी गस्तीवर असलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्कारांनी हल्ला केला. आटपाडी -मुढेवाडी रोडवर तहसीलदार बाई माने यांच्या शासकीय वाहनावर डंपर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये कोणासही गंभीर इजा झाली नाही. मात्र, धडकेनंतर माेटारीचे दरवाजे डंपरमध्येच सापडल्याने तहसीलदार माने काही काळ माेटारीतच अडकून पडल्या.
सोमवारी पहाटे तहसीलदार बाई माने आपल्या शासकीय वाहनांमधून महसूल विभागाच्या पथकासह गस्तीवर हाेत्या. त्यांच्यासमवेत तलाठी अमीर मुल्ला, कोतवाल गोरख जावीर, संजय माने, आदी हाेते. आबानगर चौक येथे गस्त घालत असताना एक डंपर भरधाव वेगाने येत असल्याचे पथकास दिसले. पथकाने त्याचा पाठलाग केला. मात्र, डंपर चकवा देऊन दिसेनासा झाला. पथकाने मुढेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने या डंपरचा पाठलाग सुरू केला.
यावेळी अचानक आटपाडी सूतगिरणीच्या समोरून भरधाव डंपर (एमएच ३७ बी ७८६) तहसीलदारांच्या माेटारीसमाेर आला. डंपरचालकाने थेट तहसीलदारांच्या माेटारीवर डंपर घातला. यावेळी चालकाने सतर्कता दाखवीत वेगाने माेटार डाव्या बाजूला वळविली. यामुळे माेटारीच्या उजव्या बाजूला डंपरची धडक बसली. दरवाजे बंद झाल्यामुळे तहसीलदार माने यांच्यासह पथक माेटारीतच अडकले.
घटनेची माहिती आटपाडी पाेलिसांना देण्यात आली. पाेलिसांनी याप्रकरणी डंपरचालकास ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते.