रबाना सय्यद हिचा चार वर्षांपूर्वी मोहसीन सय्यद याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर स्वयंपाक येत नाही. या कारणातून सासू हसीना व नणंद सायरा या दोघींनी रबाना यांना वारंवार मारहाण केली. सोमवार दि. १० मे रोजी हसीना हिने रबाना यांना जनावरांचे दूध काढण्यास सांगितले. यावेळी रबाना यांनी ‘माझ्या हाताची बोटे दुखत आहेत, आज तुम्ही जनावरांचे दूध काढा’, असे सांगितले. यामुळे पती मोहसीन याने रबाना यांना ‘तू माझ्या आईला काम सांगतेस काय,’ असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘ इथे रहायचे नाही’, असे म्हणून रबाना यांचे कपडे व साहित्य घराबाहेर फेकून दिले. त्यानंतर रात्री रबाना यांना ‘आता तुला जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणून मारहाण केली. हसीना व सायरा या दोघींनी मोहसीन याला ‘आज हिला जिवंत सोडायचे नाही,’ असे म्हणून चिथावणी दिली. मोहसीन याने गोठ्यातील गोचीड मारण्याचे औषध आणून रबाना यांना पाजून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रबाना यांनी प्रतिकार केल्याने औषधाचा काही अंश तोंडात जाऊन त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर माहेरच्या नातेवाइकांनी रबाना यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.