सांगली : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेंपोला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहतूक पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना सांगलीत घडली. याप्रकरणी मनोज अशोक शिंदे (वय ३१, रा. रूई, ता. हातकणंगले) याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्रीच्या सुमारास शिंदे हा विश्रामबागच्या दिशेने मालवाहू टेंपो (एमएच ०९ ईएम ०२३३) घेऊन निघाला होता. त्याचा वेग जादा असल्याने मार्केट यार्डजवळ वाहतूक नियोजनात असलेल्या पोलिसांनी त्याला थांबविण्याचा इशारा केला. मात्र त्याने न थांबता पोलिसांच्याच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग केला. पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या शहीद अशोक कामटे चौकाजवळ त्याला थांबवण्यात आले. त्यानंतर संशयित शिंदे याने पोलिसांवरच अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.