लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहर सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे. सीसीटीव्हीच्या नजरेतून कोणीही गुन्हेगार सुटणार नाही. भविष्यात संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी केले.
इस्लामपूर पोलीस ठाण्यात जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या निधीतून २५ लाख रुपये खर्चून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. माजी उपनगराध्यक्ष रणजित मंत्री, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल तर कोणी गुन्हेगार यातून सुटू शकणार नाही. शहरात सध्या शासनाच्या पुढाकाराने कॅमेरे लावले आहेत. स्वतः कॅमेरे खरेदी करून ते कार्यान्वित करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. पोलीस कॅमेऱ्यांची कनेक्टिव्हिटी देऊ शकतील.
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी स्वागत केले. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, धैर्यशील पाटील, उद्योजक सर्जेराव यादव, विजय राजमाने, रोजा किणीकर, डॉ. प्रदीप शहा, अमोल गुरव उपस्थित होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी आभार मानले.
चौकट :
निवासस्थानांसाठी ३० कोटी
पोलिसांच्या निवासस्थानांसाठी सातमजली इमारतीला ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दोन वर्षांत सुसज्ज इमारत उभारण्यात येईल. पोलिसांची निवास व्यवस्था सर्वोत्कृष्ट करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली.