आटपाडी : आटपाडी येथे सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी पीडित महिलेचा पती विजय लक्ष्मण बालटे, सासू मीनाक्षी लक्ष्मण बालटे (रा. आटपाडी) व परिचारिका मनीषा दीपक आवळे (रा. सांगोला) यांच्याविराेधात ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. वृषाली राऊत यांनी तक्रार दिली आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून यापूर्वीही असे प्रकार घडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आटपाडी ते दिघंची रस्त्यावर दरबार हॉटेलच्या बाजुला आवळाई-कारखाना पाटी रस्ता आहे. सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास येथून आतील बाजुस शंभर मीटर अंतरावर असलेल्या शेतातील घरामध्ये पीडितेला गोळ्या, इंजेक्शन देऊन गर्भपाताचा प्रयत्न सुरू होता. पीडितेला यापूर्वी ८ व ४ वर्षांच्या दाेन मुली आहेत. सध्या ती २४ आठवडे व ५ दिवसांची गर्भवती आहे.
रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वृषाली राऊत यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात येऊन घटनेची माहिती पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांना दिली. पाेलिसांनी तातडीने डॉ. राऊत यांच्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शल्य चिकित्सकांचे पथकही घटनास्थळी पाेहाेचले. त्यांना घटनास्थळी गर्भपात करण्यासाठीचे साहित्य आढळून आले.पाेलिसांनी कारवाई करीत पीडित महिलेचा पती विजय बालटे, सासू मीनाक्षी बालटे व परिचारिका मनीषा आवळे यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.