इस्लामपूर : कुरळप (ता. वाळवा) येथील राजारामबापू सोसायटीच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजयी झालेल्या जय हनुमान पॅनलच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पॅनलच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. मिरवणुकीतील काहींनी दगडफेक केल्यावर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र, कुरळप पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी कोणतीही शहानिशा न करता विरोधी पॅनलचे ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांनाच जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत त्यांच्या बडतर्फीची मागणी पॅनलचे नेते पै. अशोक पाटील यांनी बुधवारी केली.
इस्लामपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत युवक क्रांती शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख अशोक पाटील यांनी संवाद साधला. ते म्हणाले, सत्ताधारी पॅनलचे प्रमुख पी. आर. पाटील हे सत्तेचा गैरवापर करत आहेत. निकालानंतर त्यांच्या पॅनलच्या विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्याला परवानगी होती का? सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या सहकार्यानेच ही मिरवणूक सुरू होती. युवक क्रांती पॅनलच्या संपर्क कार्यालयासमोर मिरवणूक आल्यावर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना शिवीगाळ केली. तसेच दगडफेकही केली. मात्र, पोलिसांनी आमच्यावरच लाठीहल्ला केला. त्यामुळे आम्ही सर्व जण निघून गेलो.
पाटील म्हणाले, लाठीहल्ला झाल्यानंतर अर्ध्या तासाने घरी जात असताना सहायक पाेलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी सुनील पाटील यांच्या डोक्यात काठीने मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहे. जाधव यांना बडतर्फ करावे, यासाठी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक व्ही. टी. पाटील, सुभाष पाटील, मारुती जाधव, अश्विन पाटील उपस्थित होते.