मिरज : कवलापूर (ता.मिरज) येथील कोट्यवधी रुपयांची जमीन मूळ मालकाला कोणतीही कल्पना न देता, त्याचे बनावट आधारकार्ड तयार करून जमीन विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघा एजंटांना लोकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. संतप्त नागरिकांनी त्या तिघांची धिंड काढून त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. मोक्याच्या ठिकाणी असलेली कवलापूर येथील हरुगडे यांची जमीन ही त्यांना कोणती ही कल्पना न देता विकण्याची तयारी या एजंटांनी केली होती. यासाठी जमिनीच्या मुळ मालकांचे बोगस ओळखपत्र आणि कागदपत्रेही तयार करण्यात आली होती. मूळ मालकाच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी थेट सांगलीतल्या नोंदणी कार्यालयात येत पाच जणांच्या टोळीला पकडले.
संतप्त झालेल्या नातेवाईकांनी यावेळी तिघांना पकडून बेदम चोप दिला. नातेवाईकांचा रौद्रावतार बघून दोघे जण पळून गेले. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. अखेर नातेवाईकांनी चोप देत या तिघांची सांगली शहर पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढत पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांकडून तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.