वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील अशोकराव शंकरराव निकम यांच्या घराच्या समोरच्या व मागील दरवाज्याला विद्युत वाहक तारेचा ११ केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंब संपविण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केल्याप्रकरणी चिंचणी-वांगी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.निकम हे वांगी गावाच्या उत्तरेला असणाऱ्या बिरोबाचीवाडी रस्त्यालगत असलेल्या घरात कुटुंबासह राहतात. मंगळवारी निकम हे पत्नी व दोन मुलांसह जेवण करून झोपल्यानंतर घराच्या समोर असलेल्या ट्रान्सफाॅर्मरवरील ११ केव्ही तारेतून घराच्या पुढील व मागील दरवाजाला अज्ञातांनी करंट जोडला होता. तसेच वायर काढून घेऊन जाण्यासाठी त्याला हजार फूट लांब नायलॉन रस्सी बांधून ती उसातून जोडून ठेवली होती.सुदैवाने वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे निकम कुटुंबीय बचावले.याप्रकरणी सुरज निकम यांनी चिंचणी - वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी तपासाची चक्र तातडीने फिरवली. गुरुवार, दि. ५ रोजी सकाळी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम, माजी आमदार मोहनराव कदम यांनी भेट दिली.पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याबाबत गोपनीयता पाळली आहे. निकम कुटुंबाला संपविण्यामागे नेमके काय कारण असावे? याची चर्चा सुरू आहे.
Sangli: ११ केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंब संपविण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 4:06 PM