सांगली : जिल्हा दौऱ्यावर असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. विश्रामबाग चौकात कार्यकर्ते एकत्र येत ताफ्याला काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना अडवले. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना मुंबईत झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न केला.विश्रामबाग चौकातून राऊत यांचा ताफा पुढे जाणार होता. नेमके याचवेळी तो अडविण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते चौकात जमा झाले होते. याची खबर पोलिसांना लागताच त्यांनी सर्वांना अडवल्याने कार्यकर्त्यांचा प्रयत्न फसला.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले, जमीर सनदी, दयानंद मलपे, कुमार सावंत, स्वप्निल शिंदे, सागर कोळेकर आदी उपस्थित होते.कार्यकर्ते आक्रमकमनसे कार्यकर्त्यांकडून ताफा अडवित निषेध केला जाणार आहे, हे समजताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलिस-मनसैनिकात चकमक झाली. बराचवेळ हा वाद सुरूच होता. अखेर पाेलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले.
सांगली दौऱ्यात संजय राऊतांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 4:47 PM