अशोक पाटील
इस्लामपूर : शिराळ्यात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली देशमुख आणि महाडिक गटांना नेस्तनाबूत करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीतून सुरू आहेत. भाऊबंदकी संपवून शिवाजीराव नाईक यांना राष्ट्रवादीत घेऊन नवी वाटचाल सुरू झाली आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघाने १९५७ पासून वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील नेत्यांना कधीच स्वीकारले नाही. तेथे राजारामबापू पाटील यांनाही पराभव स्वीकारावा लागला. १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत वाय. सी. पाटील यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर शिवाजीराव देशमुख यांना राजारामबापू पाटील यांनी कोकरूड जिल्हा परिषद गटाची उमेदवारी देऊन राजकारणात आणले. त्यानंतर देशमुख यांनी काँग्रेसमध्ये राहून वसंतदादा पाटील यांच्या पाठिंब्याने बंडखोरी केली. ते शिराळा मतदारसंघातून निवडून येऊन काँग्रेसचे सहयोगी आमदार झाले.
शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे पुत्र सत्यजित यांनी मतदारसंघात काँग्रेसची ताकद कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसरीकडे नातेवाईक असलेले जयंत पाटील यांची साथ दुरावत गेली. वसंतदादा पाटील आणि पतंगराव कदम गटातील वादाने वाळवा-शिराळ्यात काँग्रेसला घरघर लागली. भाजपने याचा फायदा उठवत शिवाजीराव नाईक आणि देशमुख यांना ताकद देण्याचा डाव आखला. पण तो राज्यात महाआघाडी आल्यानंतर फसला.
तीन गटांची ताकद एकवटण्याआधीच फोडाफोडी
१९७० च्या दशकापासून नाईक भावकीत राजकीय संघर्ष सुरू आहे. वसंतराव नाईक काँग्रेसच्या तिकिटावर दोनवेळा आमदार झाले. या घराण्यातील आ. मानसिंगराव नाईक यांचे वडील फत्तेसिंगराव नाईक आणि यशवंतराव नाईक यांचे राजकारणात कधीच जमले नाही. तोच कित्ता १९९५ पासून शिवाजीराव नाईक व मानसिंगराव गिरवत आहेत. मात्र दोघांनाही प्रत्येक निवडणुकीत सत्यजित देशमुख यांचा अडसर होता. मागीलवेळी या मतदारसंघात सम्राट आणि राहूल महाडिक यांनी प्रवेश करून भाजपला जवळ केले. आता राष्ट्रवादीविरोधात शिवाजीराव नाईक, देशमुख व महाडिक या तीन गटांची ताकद एकवटण्याआधीच शिवाजीराव नाईक गटाला खेचून भाजप नेस्तनाबूत करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
देशमुख गटाचे काय?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाडिक गट सोडून सर्वांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत. भविष्यात सत्यजित देशमुख यांनाही आपल्या बाजूने वळण्याची खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे.