इस्लामपूर : बिचुद (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायतीच्या जलशुद्धिकरण केंद्राच्या दरवाजाचा कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने रात्री ते पहाटेदरम्यान चोरीचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याच्या हाती काही लागले नाही. ही घटना पहाटे ४.३० च्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडील कर्मचारी आनंदराव नाथाजी साळुंखे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. गावाला भारत निर्माण योजनेतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या पाण्याचे शुद्धिकरण केंद्र भोसले गल्लीत आहे. मंगळवारी दुपारी तेथील काम आटोपून साळुंखे हे कुलूप लावून घरी आले होते. बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पाण्यात तुरटी टाकण्यासाठी ते केंद्रावर आले होते. त्यावेळी त्यांना दरवाजाचा नटबोल्ट आणि कोयंडा उचकटलेला दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता जलशुद्धिकरण केंद्रातील सर्व साहित्य जसेच्या तसे होते. साळुंखे यांनी ही माहिती सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना दिली. त्यांनी येऊन पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.