सांगली : शहरात सुरू असलेल्या तलाठी भरती परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास अधिकाऱ्यांनी पकडले. गणेश रतन नागलोत (वय २३, रा. लांडकवाडी जि. छत्रपती संभाजीनगर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून एक मोबाईल, एक सपोर्टर, हेडफोन, लहान डबीतील इलेकट्रीक डिव्हाईस अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, १७ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभरात तलाठी भरती परीक्षा सुरू आहेत.
मिरज रस्त्यावरील वसंतदादा पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट येथे फिर्यादी नायब तहसीलदार आशिष सानप हे केंद्र निरीक्षक म्हणून कार्यरत होते. परीक्षेत एकूण २६१ उमेदवारांनी परीक्षा देत होते. मंगळवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास परीक्षा सुरु होण्यापूर्वी ते परीक्षार्थींची ओळखपत्र, हॉल तिकीट सह त तपासणी करत होते. यावेळी संशयित गणेश नागलोत हा परीक्षा देण्यासाठी आला होता. त्याने आपली बॅग आवारात ठेवली होती. या बॅग बाबत संशय वाटल्याने बॅगची तपासणी केली असता. त्यात मोबाईल, एक हेडफोन, प्लास्टिक डबी मध्ये डिव्हाईस, डिव्हाईसचे दोन बारीक सेल, तीन सिमकार्ड असे साहित्य मिळाले. या साहित्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अधिक तपास करत आहेत.
वन विभागाच्या भरती परीक्षेतही संशयित सांगलीत तलाठी भरती परीक्षेत कॉपी करण्याच्या तयारीत असलेला गणेश नागलोत याच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याच्यावर वनविभागाच्या परीक्षेत कॉपी प्रकरणी शिरोली पोलिसात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.
पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर कनेक्शन गेल्या पंधरवड्यात झालेल्या वन विभागाच्या भरती परीक्षेत संपूर्ण राज्यभरात गैरप्रकार समोर आले होते. सांगलीतही असे प्रकार झाले होते. यातील सर्व संशयित हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. आता तलाठी भरती परीक्षेतही गैर प्रकार करणारा नागलोत ही याच जिल्ह्यातील आहे.