सांगली : विश्रामबाग येथील नाकाबंदीवेळी वाहन अडविल्याचा कारणावरून रवींद्र विठ्ठल सूर्यवंशी (वय ३०, रा. श्रीरामनगर, वानलेसवाडी सांगली) याने पोलीस कर्मचाऱ्याला दगड फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संशयित सूर्यवंशी यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस कर्मचारी सचिन पवार सोमवारी (दि. १७) नाकाबंदीवेळी वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी दुपारी पावणेबाराच्या सुमारास वानलेसवाडी येथील रवींद्र सूर्यवंशी याची चारचाकी (एमएच १० सीए ६४३८) थांबविली. शहरात फिरण्याचे कारण विचारले. याचा सूर्यवंशी याला राग आला. सूर्यवंशी याने पोलीस कर्मचाऱ्यास अरेरावीची भाषा वापरून संवाद सुरू केला. थोड्या वेळाने वाहनातून खाली उतरून पोलिसाच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला जमिनीवर पाडले. शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दगड उचलून फेकून मारला. मात्र पवार यांनी तो चुकविला. यानंतर कमरेखालील भागावर लाथ मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत शासकीय कामात अडथळा आणणे तसेच संचारबंदीचा भंग करणे असे गुन्हे सूर्यवंशी याच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत. अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.