इस्लामपूर : किल्ले मच्छिन्द्रगड (ता. वाळवा) येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकावर तलवारीने हल्ला चढवत खुनाचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला आहे. सुधीर रवींद्र गाडे (वय ३५, रा. गोपाळ वस्ती, किल्ले मच्छिन्द्रगड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी धनाजी ऊर्फ भावड्या विश्वास मदने याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुधीर हा सकाळी घराच्या पाठीमागील रस्त्यावर थांबून मित्रांसमवेत बोलत होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या धनाजीने त्याला दारू पिण्यासाठी १०० रुपयांची मागणी केली. सुधीर याने आपल्याकडे पैसे नाहीत असे म्हटल्यावर रागाच्या भरात धनाजीने त्याला शिवीगाळ केली आणि ‘तुला दाखवतोच’ असे म्हणत दुचाकीवरून घरी गेला.
काही वेळातच धनाजी हा पुन्हा दुचाकीवरून तलवार घेऊन सुधीर गाडे याच्याजवळ आला. ‘तुला आता जिवंत ठेवत नाही’ असे म्हणत त्याने सुधीरवर तलवारीने हल्ला केला. यामध्ये सुधीरच्या कपाळावर, दंडावर आणि हाताच्या बोटावर धनाजीने तलवारीचे वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी भांडण सोडवत असताना सुधीरच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर धनाजी मदने हा दुचाकीवरून पसार झाला. हवालदार उत्तम माळी अधिक तपास करत आहेत.