शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शहरातील चांदणी चौक येथील प्लाॅटमध्ये अतिक्रमण करून शासकीय अधिकाऱ्याने बांधकाम केले आहे. या बांधकामावर कारवाई करावी, यासाठी बुधवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या दालनात महिलेने अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सारिका सुनील पाटील असे महिलेचे नाव आहे. या महिलेला वेळीच रोखण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली.
शहरातील माळी चित्रमंदीर पाठीमागे पाटील यांची अडीच गुंठे जागा आहे. सातबारावर तशी नोंद आहे. त्यांच्या शेजारी असणाऱ्या गजानन गुरव यांची अडीच गुंठे क्षेत्र आहे. गुरव यांनी ३०० चाैरस फूट अतिक्रमण केल्याची पाटील यांची तक्रार आहे. सिटी सर्व्हे उताऱ्यावर मात्र गुरव यांचे क्षेत्र २८०० चाैरस फूट आहे. त्या आधारे महापालिकेच्या नगररचना विभागाने गुरव यांना बांधकाम परवाना दिला आहे. हा वाद न्यायालयात गेला आहे. पाटील यांनी नगरभूमापन कार्यालय, महापालिकेकडे तक्रार दाखल केली. मात्र कारवाई होत नसल्याने पाटील कुटुंबीय खचले होते. मंगळवारी सारिका पाटील या आयुक्तांना भेटण्यासाठी आल्या होत्या. आयुक्त नसल्याने त्या महापौर दालनात आल्या.
महापौरांसमोर कैफियत मांडत त्यांनी पर्समधून बाटली बाहेर काढली. ज्वालाग्राही पदार्थ अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. महापौरांसह उपस्थितांनी त्यांना रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
हा प्रकार नगरभूमापन कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे घडला आहे. यामध्ये महापालिकेचा काहीही संबंध नाही. सिटी सर्व्हे उताऱ्यावर असलेल्या नोंदी नुसारच नगररचना विभागाने बांधकाम परवाना दिला आहे. तरीही पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त पवार यांच्यासमोर सुनावणी होवून निर्णय घेतला जाईल, असे उपायुक्त रोकडे यांनी सांगितले. गुरव यांनी शासकीय अधिकारी पदाचा दुरुपयोग करत पाटील यांच्या जागेत अतिक्रमण केले आहे. ही वस्तुस्थिती आहे. न्यायालयाची स्थगिती असतानाही गुरव यांनी बांधकाम केले असून न्यायालयाचाही अवमान केला आहे. सुनील पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी महापालिकेकडे रितसर तक्रार केली होती. नगर भूमापन कार्यालयात त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. महापालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी त्या आल्या होत्या. आयुक्त नसल्याने माझ्या दालनात आल्या. संबंधित अधिकाऱ्याने केलेले अतिक्रमण चुकीचे आहे. ते काढा अन्यथा आत्मदहन करते, असा इशारा दिला, असे स्पष्टीकरण महापौर सूर्यवंशी यांनी दिले.