सांगली : ओव्हरलोड अटकावून ठेवलेले वाहन सोडण्याच्या मागणीसाठी एकाने येथील आरटीओ कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सिद्राम कृष्णा बागले (रा. नरसिंहगाव, ता.कवठेमहांकाळ) असे त्यांचे नाव असून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील कोल्हापूर रोडवरील फळ मार्केटजवळ ९ एप्रिल रोजी बागले याचा मालवाहतूक ट्रक आरटीओच्या पथकाने थांबवून तपासला असता, त्यातून ओव्हरलोड आढळून आला. त्यानंतर हा ट्रक अटकावून ठेवण्यात आला होता. यासाठी बुधवारी दुपारी बागले यांनी कार्यालयात येत वाहन सोडण्याची विनंती केली होती. त्यावर मोटारवाहन निरीक्षकांनी या वाहनातील माल उतरवून घेण्यासाठी दुसरे वाहन आणा, दंडाची रक्कम भरून वाहन घेऊन जावा, असे सांगितले होते.
यावर नाराज होऊन मला कोणता पर्यायच ठेवला नाही म्हणत सोबत आणलेल्या बाटलीतील डिझेल अंगावर ओतून घेतले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना थांबविण्यात आले. त्यानंतर रवींद्र नामदेव सोळंकी यांनी संजयनगर पोलिसात बागले यांच्याविरोधात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे.