बंड विशाल पाटील यांचे की काँग्रेसचे?, माघारीसाठी मनधरणीचा प्रयत्न अयशस्वी
By हणमंत पाटील | Published: April 23, 2024 12:30 PM2024-04-23T12:30:08+5:302024-04-23T12:35:34+5:30
जयंत पाटील यांचा चारवेळा खुलासा
हणमंत पाटील
सांगली : महाविकास आघाडीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी सोमवारी मागे घेतली नाही. माघारीसाठी त्यांचे मन वळविण्याचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता आघाडी धर्म म्हणून काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई होईल; परंतु विशाल पाटील यांच्यामागे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते वगळता संपूर्ण कार्यकर्त्यांची फळी उभी आहे. त्यामुळे हे बंड केवळ विशाल पाटील यांचे नाही तर काँग्रेसचे आहे, असेच म्हणावे लागेल.
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात आतापर्यंत दोन पोटनिवडणुकांसह १९ निवडणुका झाल्या. त्यापैकी १९५७, २०१४ व २०१९ निवडणुकांचा अपवाद वगळता सलग १६ निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. त्यामध्येही ११ वेळा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना ११ पंचवार्षिक निवडणुकांत सांगलीकरांनी निवडून दिले आहे. त्यामुळे सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, ही जागा महाविकास आघाडीने सोडावी, यासाठी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी, तसेच राज्यातील काँग्रेस नेत्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले, मात्र उद्धवसेनेने ही जागा सोडण्यास नकार दिला.
मैत्रीपूर्ण लढतीलाही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी विशाल पाटील यांना माघार घेण्याचा संदेश दिला, मात्र काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही आता निवडणुकीतून माघार घ्यायची नाही. पक्षाने एबी फार्म दिला तर ठीक, अन्यथा अपक्ष निवडणुकीची तयारी सुरू करू असा चंग बांधला. त्याप्रमाणे विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज भरले; परंतु काँग्रेसने विशाल यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला नाही. त्याचवेळी विशाल पाटील यांना अपक्षच निवडणूक लढवावी लागणार हे स्पष्ट झाले होते, तरीही विशाल यांनी माघार घ्यावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरूच होते. पण, माघारीच्या मुदतीनंतर विशाल यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने त्यांनी बंड केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना विशाल पाटील यांचा प्रचार आघाडी धर्मामुळे करता येणार नाही. मात्र, त्यांना छुपा पाठिंबा असल्याचे चित्र सांगलीत आहे. त्यामुळे ही बंडखोरी यशस्वी होणार का, हे आगामी निवडणुकीत मतदारांच्या प्रतिसादावर ठरणार आहे.
उमेदवारीवेळी कठोर अन् माघारीवेळी मऊ..
खासदार संजय राऊत यांनी चंद्रहार पाटील यांच्या मोर्चेबांधणीसाठी सांगलीत तीन दिवस तळ ठोकला. मात्र, या काळात सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्याऐवजी टीकेची झोड उठविली. तुम्ही सोबत आला ठीक, नाही तर तुमच्या शिवाय, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना डिवचले. त्यामुळे हा प्रश्न केवळ विशाल पाटील यांच्या उमेदवारी पुरता न राहता काँग्रेसच्या अस्तित्वाचा व अस्मितेचा प्रश्न करण्यात आला. त्यानंतर राऊत यांनी पुन्हा सांगलीचा दोन दिवसांचा दौरा करून विशाल पाटील यांच्या माघारीसाठी केविलवाणा प्रयत्न केला, यावेळी त्यांची भाषा सौम्य व विनवणीची होती.
जयंत पाटील यांचा चारवेळा खुलासा
सांगलीची उमेदवारी काँग्रेसला म्हणजेच विशाल पाटील यांना मिळू नये, यामागे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्या वादाची किनार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच सांगलीची उमेदवारी उद्धवसेनेला मिळण्यासाठी पडद्यामागे सूत्रे हालविली असल्याची सांगलीत उघडपणे चर्चा आहे. त्यामुळेच जयंत पाटील यांना गेल्या आठ दिवसांत सांगलीतील मविआच्या प्रचारात चारवेळा उद्धवसेनेच्या उमेदवारीशी माझा काही संबंध नसल्याचा खुलासा करावा लागला आहे.