सांगली : जत तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी राजकीय स्वार्थापोटी स्टंटबाजीने बेदाणे सौदे बंद पाडले. चुकीचे घडल्याने त्याचा निषेध करत असल्याचे प्रसिद्धीपत्रक बाजार समितीचे संचालक सुशील हडदरे यांनी दिले आहे.
त्यांनी सांगितले की, नवीन बेदाण्याला प्रतवारीनुसार १५० ते २४० दर मिळत आहे. त्यात शेतकरी समाधानी आहेत. त्यांच्या परवानगीनेच सौदे सुरू आहेत. बुधवारी स्टंटबाज राजकीय मंडळींनी गोंधळ घालून सौदे बंद पाडले. यापूर्वीही समितीत शांततामय मार्गांनी यशस्वी आंदोलने झाली आहेत, पण व्यापाऱ्यांवर कधीही दहशत निर्माण केली नाही, बाजारपेठ बंद पाडली नाही. त्यामुळे बुधवारच्या आंदोलनाचा हेतू शुद्ध नव्हता, तो स्वार्थी व राजकीय असल्याचे दिसून आले.
तासगाव व सांगलीत बेदाणा बाजारपेठ २५ वर्षांच्या प्रयत्नांती उभी राहिली. बाजारपेठेविषयी विश्वासार्हता आहे. याचे भान आंदोलनकर्त्यांनी ठेवायला हवे होते. आंदोलनांमुळे शेतकरी व बाजारपेठ उद्ध्वस्त होणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी होती. बाजारपेठेविषयी चुकीचा संदेश देशभर गेल्यास अतोनात नुकसान होईल. काल गोंधळ व घबराटीमुळे परराज्यातील निघून गेले. ७०० टन बेदाणा विक्रीविना परत गेला. आंदोलनाच्या नावाखाली बाजारपेठेत दहशत निर्माण करण्याचा संबंधितांचा डाव होता. याची चौकशी करून बाजार समितीने गुन्हे दाखल करावेत. सर्व खरेदीदारांना संरक्षण द्यावे.
हडदरे यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांना बेदाणा दराबाबत कळवळा असेल तर त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. बेदाण्याचा शेतीमालात समावेश करावा. हमीभावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा.
चौकट
परदेशी बेदाणा आयात करून स्थानिक बाजारपेठेत व कोल्ड स्टोअरेजवर करून बेदाण्याचे भाव पाडण्याचे षड्यंत्र करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध बाजार समितीने घ्यावा, गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही हडदरे यांनी केली. त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करावेत. बेदाणा उत्पादक नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे तारण कर्ज प्रकरणे करणाऱ्यांची व शासकीय बँकांची चौकशी करण्यास भाग पाडावे.