मिरज : केंद्र शासनाने खतावर अनुदानात वाढ करून रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत शेतकऱ्यांना भडकावण्याचे विरोधकांचे कारस्थान हाणून पाडल्याचे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रोहित चिवटे यांनी म्हटले आहे.
खतांची कोणतीही दरवाढ झालेली नाही. काही समाजकंटकांकडून सोशल मीडिया व प्रसारमाध्यमात रासायनिक खतांच्या दरांत वाढ झाल्याच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. काही खाजगी खत कंपन्यांनी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने खतांचे दर वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, कोणत्याही रासायनिक खत दरवाढीला केंद्राने मंजुरी दिली नसल्याचे केंद्रीय रसायनमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. देशातील सर्वात मोठी खत उत्पादक कंपनी इफकोनेही कोणत्याही खतांची दरवाढ केलेली नाही. खरीप हंगामातील बारा लाख मेट्रिक टन खतांचा साठा केंद्रांने राज्यांना अगोदरच पाठवला असून त्याच्या किमती पूर्वीप्रमाणेच आहेत. मात्र शेतकऱ्यांना भ्रमित करून अशांतता निर्माण करण्यासाठी विरोधकांचे कारस्थान सुरू आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केंद्र शासनातर्फे खतांसाठी ८० हजार कोटी सबसिडी दिली जात होती. त्यात आणखी पंधरा हजार कोटी अनुदान वाढवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसणार नाही. वाढीव अनुदानामुळे विरोधकांना मात्र शेतकऱ्यांना भडकावण्याची संधी हुकली आहे. तसेच वाढीव किमतीने खते विक्री होत असेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन रोहित चिवटे यांनी केले आहे.