लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेतील कामचुकार कर्मचा-यांना आळा बसण्यासाठी आता आयुक्तांनी अधिकारी व कर्मचा-यांची हजेरी फेस रीडिंगव्दारे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंत्रणा बसविण्यात आली असून २ हजार ७३७ कर्मचा-यांची नोंदणी केली जात आहे. यामुळे अधिकारी व कर्मचा-यांना आता शिस्त लागणार असून महापालिकेचे कामकाज गतिमान होणार आहे.
महापालिका अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसतात, अशा तक्रारी नगरसेवक व नागरिकांच्या येत आहेत. काही कर्मचारी हे वेळेवर प्रामाणिकपणे कामावर येतात, मात्र अनेक कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे समोर आले आहे. शिवाय, काही जण सकाळी कार्यालयात तोंड दाखवतात, नंतर गायब होतात, अशादेखील तक्रारी नगरसेवकांच्या आहेत. त्यामुळे कामचुकार कर्मचा-यांना वेळेत कामावर येण्याची सवय लागावी आणि कामकाज गतिमान व्हावे, यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्वच कामगारांची फेस रीडिंगद्वारे हजेरी घेण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले आहेत.
त्यानुसार, उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांतील कर्मचा-यांचे फेस रीडिंग नोंदणीचे काम सुरू झाले आहे. यामध्ये १ हजार ४६८ कायम कर्मचारी, ४२० मानधन कर्मचारी, ४९९ स्वच्छता कर्मचारी, तर ३४० बदली तथा संपकालीन कर्मचारी आहेत. अशा एकूण २ हजार ७३७ कर्मचा-यांची हजेरी नोंदविली जाणार आहे. या सर्वांचे फेस रीडिंग घेतले जात आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रत्येक कर्मचा-याला फेस रीडिंगवर आपली हजेरी द्यावी लागणार आहे. यामुळे कर्मचारी वेळेत कामावर येतील आणि प्रशासनाचे काम गतिमान होईल, अशी माहिती आस्थापना अधिकारी अनिल चव्हाण यांनी दिली.