अण्णा खोत ल्ल मालगाव सर्वच राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली असताना, पूर्वभागातील अजितराव घोरपडे गटात शांतता दिसून येत आहे. निवडणुकीसंदर्भात माजी मंत्री घोरपडे यांनी राजकीय भूमिका अद्याप स्पष्ट न केल्याने पूर्वभागातील त्यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. घोरपडे भूमिका कधी स्पष्ट करणार, या प्रतीक्षेत सध्या कार्यकर्ते आहेत. मिरज पूर्वभाग तसा काँग्रेसचा बालेकिल्ला; मात्र घोरपडे यांच्या विकास आघाडीने विधानसभेच्या निवडणुकीत धक्का देऊन या बालेकिल्ल्यावर वर्चस्व ठेवले. विधानसभा मतदार संघाच्या पुनर्रचनेत मिरज मतदारसंघ आरक्षित झाला. पुनर्रचनेनंतर घोरपडे यांचे थोडेफार या भागाकडे दुर्लक्ष झाले, तरी त्यांच्या विचारधारेशी जोडलेला कार्यकर्ता आजही त्यांच्या आदेशावर ठाम आहे. गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी घोरपडे यांचे व राष्ट्रवादीचे सूत जमले होते. ते या पक्षात असताना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी देताना त्यांनी पूर्वभागातील समर्थकांना झुकते माप दिले होते. निवडणुकीत जिल्हा परिषदेत आप्पासाहेब हुळ्ळे, राजेंद्र माळी व पंचायत समितीत विरोधी पक्षनेते अरुण राजमाने, शंकर पाटील, सारिका खताळ हे राष्ट्रवादीचे पाच सदस्य निवडून आले होते. मालगावमध्ये काँग्रेसचा पाडाव करून राष्ट्रवादीने पर्यायाने घोरपडे गटाने ताकद दाखवून दिली होती. केवळ घोरपडे यांच्यामुळे राष्ट्रवादीला पूर्वभागात पाय टेकता आले होते. पूर्व भागात घोरपडे गटाची आजही राजकीय ताकद टिकून आहे, हे नाकारता येत नाही. सध्या मतदारसंघात राजकीय पक्षांची निवडणुकीची तयारी सुरु आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी उमेदवारीपूर्वी मतदार संघात संपर्क मोहिमा राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र पूर्वभागातील घोरपडे गटात शांतता दिसून येत आहे. अजितराव घोरपडे गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपमध्ये दाखल झाले होते. कवठेमहांकाळ-तासगाव मतदार संघात पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या दगाबाजीवर ते नाराज आहेत. त्यामुळे त्यांची भाजपच्या कार्यक्रमात अपवादात्मक हजेरी दिसून येत आहे. आता त्यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नवीन पक्षीय भूमिका काय असणार, हे अद्याप स्पष्ट नसल्याने व घोरपडे यांनी कोणत्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका लढवायच्या, याचा आदेश न दिल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत दिसून येत आहेत. कार्यकर्ते तटस्थच अजितराव घोरपडे यांच्या निर्णयावर त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांची राजकीय भूमिका अवलंबून असते. निवडणुकीसंदर्भात घोरपडे यांची राजकीय व पक्षीय भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत व तटस्थ आहेत. घोरपडे निवडणुकीसंदर्भात भूमिका कधी स्पष्ट करणार व आदेश कधी देणार, याची या भागातील त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे.
मिरज पूर्वचे घोरपडेंच्या भूमिकेकडे लक्ष
By admin | Published: November 02, 2016 11:14 PM