कसबे डिग्रज : येथील शतकमहोत्सवी सोसायटी निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. १३ पैकी ६ जागा मिळविणाऱ्या ‘जयंत’ पॅनेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गुप्त मतदानाद्वारे निश्चित झाले. त्यामुळे गावात मोठा गोंधळ, तणाव निर्माण झाला. त्यानंतर तात्काळ ग्रामविकासच्या सात सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. त्याबाबत सोमवार, दि. ७ डिसेंबर रोजी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांना पदभार व सह्यांचे अधिकार देणे आणि राजीनामे मंजूर करणे याबाबत बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.कसबे डिग्रज सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक मोठ्या ईर्षेने लढविली गेली. कोणत्याही परिस्थितीत सोसायटी राष्ट्रवादीस मिळाली पाहिजे, याबाबत आ. जयंत पाटील यांनी गावातील गटबाजी मिटवून सोसायटी जिंकण्यासाठी बैठका घेतल्या होत्या. पण त्यात यश आले नाही. त्यानंतर मिरज तालुका कॉँग्रेसचे आनंदराव नलवडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे कुमार लोंढे, रामभाऊ मासाळ, सुुधीर देशमुख, ज्येष्ठ नेते रामराव खांडेकर, माजी सरपंच अशोकराव चव्हाण, सुुभाषराव चव्हाण ही मंडळी ‘जयंत’ पॅनेलच्या नावाखाली एकत्र आली, तर कॉँग्रेसचे माजी जि. प. सदस्य श्रीपाल चौगुले आणि राष्ट्रवादीचे माजी पं. स. सदस्य युवक नेते अजयसिंह चव्हाण यांनी ‘ग्रामविकास’ आघाडी केली. चुरशीच्या निवडणुकीत ग्रामविकासला सात आणि जयंत पॅनेलला सहा जागा मिळाल्या. सत्ता मिळविली, या अविर्भावात असणाऱ्या ग्रामविकासला ‘धोबीपछाड’ देत जयंत पॅनेलने अध्यक्ष, उपाध्यक्षपद मिळविले. त्यामुळे ‘फुटणार कोण’ हे समोर न आल्याने ग्रामविकासच्या सातही जणांनी राजीनामे दिले आहेत.आता नूतन पदाधिकाऱ्यांनी सह्यांचे अधिकार देणे, पदभार देणे आणि सातजणांचे राजीनामे याबाबत निर्णय घेणे याकरिता संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी सर्व नूतन संचालकांना नोटिसा दिल्या आहेत. मात्र या नोटिसा ग्रामविकासच्या सातजणांनी स्वीकारल्या नाहीत, असे रमेश काशीद यांनी सांगितले.सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष कसबे डिग्रजच्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे काय होणार?, सहकार उपनिबंधक प्रशासक आणणार काय?, फुटलेला सदस्य उपस्थित राहणार काय?, प्रशासक आला तर नव्याने निवडणूक होणार का?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (वार्ताहर)सदस्यांना सहलीवर पाठविल्याची चर्चा ग्रामविकासने सर्व सात सदस्यांना सहलीवर पाठविल्याची चर्चा आहे, तर आपल्या सहाजणांसह एक सदस्य उपस्थित करून बहुमत सिद्ध करण्याची तयारी ‘जयंत’ पॅनेलने केली असल्याचे समजते. सोमवार, दि. ७ डिसेंबर रोजी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांना पदभार व सह्यांचे अधिकार देणे आणि राजीनामे मंजूर करणे याबाबत बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
‘त्या’ सातजणांच्या भूमिकेकडे लक्ष
By admin | Published: December 07, 2015 12:00 AM