अविनाश कोळीसांगली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’साठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने सोप्या पद्धतीने ड्रेस कोडची माहिती परीक्षा केंद्रांना पाठवली होती. तरीही नीट तपासणी न करता अत्यंत वाईट पद्धतीने तपासणी करण्यात आली. मुला-मुलींना कपडे काढायला लावून ते उलटे घालायला लावल्याने सांगलीचे परीक्षा केंद्र देशभरात चर्चेत आले आहे. परीक्षा संस्था याची दखल घेणार का? संबंधितांवर कारवाई करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.सांगलीच्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर ७ मे रोजी नीटच्या परीक्षेवेळी झालेला प्रकार पालकांसह समाजातील सर्वच घटकांना संतापजनक वाटला. अनेकांनी संताप व्यक्त केला. काही पालकांनी राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडे तक्रारीही केल्या. काही सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी, वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या. इतक्या तक्रारी झाल्यानंतरही प्रत्यक्षात एकाही प्रशासनाने अद्याप चौकशीचे आदेश दिले नाहीत. त्यामुळे प्रशासकीय उदासीनतेबद्दलही आता संताप व्यक्त केला जात आहे.
परीक्षेकरिता काय होते नियम?
- परीक्षार्थींना हाफ टी-शर्ट व पायघोळ पँट (ट्राऊझर) तसेच पायात स्लिपर असा ड्रेसकोड बंधनकारक होता.
- कोणताही धातू किंवा तशी वस्तू परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई होती.
- पाण्याची बाटली लेबल नसलेली ट्रान्स्परन्ट हवी होती.
- मास्क अनिवार्य होता
नियम नीट वाचलेच नाहीतकस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातील तपासणी कर्मचाऱ्यांनी ‘नीट’चे नियम नीट वाचलेच नाहीत. त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने मुला-मुलींशी ते वागले.
अन्य केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांशी सुसंवाद
शहरातील अन्य परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षेचे चांगले नियोजन करण्यात आले. ड्रेस कोड तसेच अन्य नियमांची माहिती देण्यासाठी प्रवेशद्वारावर कर्मचारी व पोलिस तैनात केले होते. विद्यार्थ्यांना प्रसंगी नियम पाळण्याबाबत मदतही केली जात होती. अनेक केंद्रांवर मोफत मास्क देण्यात आले. कागदपत्रे विसरलेल्या मुलांच्या पालकांना त्यांनी फोन करून ती मागवली.
कॅमेऱ्यांबाबत शंका, पालक धास्तावलेसांगलीतील ज्या केंद्रात व ज्या खोलीत मुलींना कपडे काढायला लावले, त्याठिकाणी कॅमेरे होते का, याची विचारणा काही पालकांनी संस्थेकडे केली. काही पालकांनी प्रत्यक्ष केंद्राच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तरीही त्यांच्या मनात धास्ती कायम आहे.