वारणावती : चांदोली परिसराच्या वैभवात भर टाकणाऱ्या वारणा धरणाच्या प्रवेशद्वारावर सुसज्ज व आकर्षक कमान, वाहन पार्किंग, पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे आदी व्यवस्था केल्यामुळे धरणाचे रूपडे पालटले आहे. ते पर्यटकांना आकर्षित करत आहे.
शिराळा तालुक्यातील पश्चिम टोकावरील ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले चांदोली धरण राज्यातील मातीचे सर्वात मोठे धरण आहे. धरणामुळे हा परिसर बारा महिने हिरवळीने नटलेला असतो. धरणाच्या जलाशयाला वसंत सागर असे नाव आहे. वारणा नदीवर असल्याने ‘वारणा धरण’ या नावानेही ओळखले जाते. धरणाच्या पाणलोट क्षेत्राला सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सातारा या चार जिल्ह्यातील सरहद्दी आहेत. सभोवताली चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यान व धरण पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून वर्षाला हजारो पर्यटक भेट देत असतात. हिरव्यागर्द झाडीने नटलेल्या डोंगर-दऱ्या, फेसाळणारे धबधबे व मध्यभागी असलेल्या चांदोली धरणाच्या वैभवामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे, गाड्यांचे पार्किंग, वारणा धरण नावाची कमान व सुशोभीकरणाच्या कामामुळे आणखी भर पडली आहे.
धरणाच्या पायथ्याला वारणा धरण नावाने सुसज्ज लोखंडी प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. वाहन पार्किंगसाठी शेड बांधण्यात आले आहे. येथील वडाच्या झाडाभोवती कट्टादेखील नव्याने बांधण्यात आला आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतींचे बांधकाम घडीव दगडांमध्ये करण्यात आले आहे. आतमध्ये काही अंतरापर्यंत येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते, त्याच्या दोन्ही बाजूला गटारी व पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. दोन्ही रस्त्यांच्या मधोमध असलेला कठडा सुशोभित करून त्यामध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. संपूर्ण धरण परिसरातील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत.
कोट
चांदोली धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंगसारखी सुविधा व आकर्षण वाटावे अशी सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत.
- टी. एस. धामणकर, शाखाधिकारी, वारणा पाटबंधारे विभाग
फोटो : चांदोली धरणाच्या वैभवात भर घालणारी आकर्षक कमान, पार्किंग व्यवस्था, घडीव दगडांमधील बाजूच्या भिंती, धरण परिसरातील पथदिवे.