लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या पाच वर्षांमधील वीजबिलात साडेपाच कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. वीजबिलांचे २०१०पासून लेखापरीक्षण केल्यास घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढू शकते. त्यामुळे गत दहा वर्षांमधील बिलांचे शासकीय ऑडिट करण्याची मागणी नगरसेवक संतोष पाटील व नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली आहे.
याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. महापालिका वीजबिल घोटाळ्याचा आम्ही सुरुवातीपासून पाठपुरावा करत आहोत. सुरुवातीला हा घोटाळा सव्वा कोटींचा होता. २०१५पासून बिलांची तपासणी केल्यानंतर घोटाळा साडेपाच कोटींवर गेला. सन २०१० पासूनचे ऑडिट केल्यास ह्या घोटाळ्याची रक्कम १० कोटींपर्यंत जाऊ शकते. आयुक्तांनी वीजबिलांच्या लेखापरीक्षणासाठी शासनाशी पत्रव्यवहार केला आहे. भविष्यात लेखापरीक्षण सुरु झाल्यास ते २०१०पासून करावे, अशी मागणी पाटील व साखळकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.