सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना अनेक जण बेडसाठी प्रयत्न करत आहेत. ज्यांना ऑक्सिजनसह उपचाराची आवश्यकता आहे त्यांनीच रुग्णालयात दाखल व्हावे अन्यथा घरी थांबूनच उपचार घ्यावेत. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता, रुग्णालयातून ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी वापराचे ऑडिट करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डॉ. चौधरी म्हणाले, खासगी रुग्णालयातही आता कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे त्याचा वापरही योग्य होणे आवश्यक आहे. याबाबत तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात रेमडेसिविरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. या इंजेक्शनचाही अनावश्यक वापर करू नये याबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेमडेसिविरचा जिल्ह्यात तुटवडा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
४१ डेडिकेटेड कोविड रुग्णालय, १४ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर
जिल्ह्यात सध्या कोरोना उपचारासाठी ४१ डेडिकेटेड कोविड रुग्णालय उपलब्ध आहेत. तर १४ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यरत आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.