शिराळा : शिराळा शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शिवणी येथे एक एकर जागा उपलब्ध झाली असल्याची माहिती नगराध्यक्षा सुनीता निकम व मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली. तसेच शहरास नवीन पाणीपुरवठा योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. येथील व्यापारी सभागृहात नगराध्यक्षा निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी ही माहिती दिली.
त्या म्हणाल्या की, शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी जागा अपुरी होती. त्यामुळे या जागेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यास मंजुरी मिळाली असून शिवणी गावठाणातील एक एकर क्षेत्र कचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध झाले आहे. शहराचा वाढता विस्तार आणि १३५ लिटर प्रति व्यक्ती पाणी वापर यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना करण्यात येणार आहे. प्रदूषणविरहित वाहतुकीस प्रोत्साहन म्हणून शहरात चार ठिकाणी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करण्यात येणार आहेत. बांधकाम विभागाच्या विविध कामांना मंजुरी देणे यासह विविध विषयांवर चर्चा झाली. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी त्यांच्याही प्रभागात विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
यावेळी उपनगराध्यक्ष विजय दळवी, मुख्याधिकारी योगेश पाटील, सुनंदा सोनटक्के, अर्चना शेटे, प्रतिभा पवार, सुजाता इंगवले, विश्वप्रताप नाईक, संजय हिरवडेकर, नेहा सूर्यवंशी, आशाताई कांबळे, राजेश्री यादव, सीमा कदम, उत्तम डांगे, वैभव गायकवाड, मोहन जिरंगे, अभियंता अविनाश जाधव, अर्चना गायकवाड, नयना कुंभार आदी उपस्थित होते. प्रीती पाटील यांनी सभेच्या कामकाजाचे वाचन केले.
चौकट
साैरऊर्जा प्रकल्प उभारणार
शहरातील पथदिवे व नगरपंचायत कार्यालयात विजेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ८ मार्च महिला दिनानिमित्त कार्यक्रम व अंगणवाडीसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत निधी देण्यात येणार आहे.