जत : आवंढी (ता. जत) येथे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून अवैद्य दारू विक्री सुरू आहे. संबंधित दारू विक्रेते व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी आर. ई. नवले व पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांना निवेदन दिली आहे.
आवंढी येथे ६ जानेवारी २०१९ रोजी गावतील संपूर्ण दारूबंदी होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे गुप्त मतदान घेण्यात आले होते. मतदान प्रक्रियेत गावातील एकूण ७२४ पैकी ६५९ महिलांनी दारू बंदीच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे १९ जानेवारी २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी गावांमध्ये कायमस्वरूपी दारूबंदीचे आदेश दिले होते. काही दिवसांपासून या आदेशाचे उल्लंघन करत राजरोसपणे गावात दारू विक्री सुरू आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली आहे; परंतु संबधितांवर कोणतीच कारवाई झाली नाही. संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
संगीता कोडग, कांचन कोडग, रत्नाबाई कोडग, मालन कोडग, अनुसया तोरणे, सुनीता वाघमारे, द्रोपदी कोडग यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
फोटो-05jat02
फोटो ओळ : आवंढी (ता. जत) येथे अवैध दारू विक्री बंद करावी, या मागणीचे निवेदन महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आर. ई. नवले यांना दिले.