सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संदीप सुरेश आवटी यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. स्थायीसह महिला व बालकल्याण, समाजकल्याण समिती सभापतींच्या निवडीही बिनविरोध पार पडल्या. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेत भाजपसमोर लोटांगण घातले.
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नसीमा रज्जाक नाईक, तर समाजकल्याण समिती सभापतीपदी स्नेहल सावंत यांची निवड करण्यात आली. सावंत यांची सलग पाचव्यांदा सभापतीपदी वर्णी लागली. यापूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळात तीनदा त्या सभापती होत्या. त्यानंतर भाजपच्या सत्ताकाळात पहिल्यावर्षी त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली होती. आता दुसऱ्यावर्षीही त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. या तीनही समितीवर भाजपचे वर्चस्व आहे.
गुरुवारी भाजपने तीन सभापती पदांसाठी आवटी, नाईक व सावंत यांचे एकेकच अर्ज दाखल केले होते, तर विरोधी काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीकडून स्थायी समितीसाठी मनोज सरगर, महिला व बालकल्याण समितीसाठी आरती वळवडे व समाजकल्याण समितीसाठी योगेंद्र थोरात यांचा अर्ज दाखल केला होता.
निवडीपूर्वी भाजपचे गटनेते युवराज बावडेकर, शेखर इनामदार व सुरेश आवटी यांनी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर व राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांची भेट घेऊन, निवडी बिनविरोध करण्याची विनंती केली. काँग्रेस - राष्ट्रवादीचे या तीनही समित्यांवर संख्याबळ कमी आहे. भाजपकडे बहुमत असल्याने विरोधकांनी निवडणूक न लढता माघार घेतली. स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे संदीप आवटी, महिला - बालकल्याण समिती सभापतीपदी नसीमा नाईक, तर समाजकल्याण सभापतीपदी स्नेहल सावंत यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर नूतन सभापतींचा आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, मैनुद्दीन बागवान, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, पक्षनिरीक्षक रवी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, सुरेश आवटी यांच्यासह नगरसेवकांनी सत्कार केला.
यावेळी शेखर इनामदार म्हणाले, विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. याचा विचार करून पक्षाने सर्वसमावेशक निवडी केल्या आहे. एकमताने तीनही उमेदवार निवडले आहेत. विरोधी पक्षांनी सहकार्य केल्यामुळे निवडी बिनविरोध झाल्या.
एकाच प्रभागात दोन सभापतीमहापालिकेच्या समाजकल्याण समिती सभापतीपदी स्नेहल सावंत, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नसीमा नाईक यांची निवड झाली. या दोन्ही नगरसेविका एकाच प्रभागातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे श्यामरावनगर परिसराला दोन सभापती पदांची लॉटरी लागली. नाईक या पहिल्यांदाच नगरसेविका झाल्या आहेत, तर सावंत यांची ही भाजपच्या सत्ताकाळातील दुसरी टर्म आहे.
भाजपमध्ये लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकजण पदाची मागणी करू शकतो. पण पक्षाने निर्णय घेतल्यानंतर सर्वचजण एक होऊन एकमताने निवडी होतात. त्यानुसार तीनही सभापतींची एकमताने निवड झाली आहे. कोणीही नाराज नाही.- सुधीर गाडगीळ, आमदार