अविनाश बाड ।आटपाडी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशात चार ऋतू मानले आहेत. उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा आणि हिवाळा. यापैकी पावसाळा आणि परतीचा मान्सून हे दोन ऋतू एकत्र करून आटपाडी तालुक्यातील पर्जन्यवृष्टी मोजली जाते. गेल्या ६६ वर्षात या दोन ऋतूत सरासरी फक्त ३० दिवस पाऊस पडला आहे. सरासरी पर्जन्यमान ३५५ मि.मी. म्हणजे तालुक्यात पडणाºया पावसाच्या दिवशीही सरासरी ११ ते १२ मि.मी. पाऊस पडतो. या पावसाचा कसलाच उपयोग नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे कोरड्या पावसाळ्यांना या भागाला सामोरे जावे लागत आहे.
आटपाडी तालुक्यात जून ते आॅक्टोबर असा दोन्ही ऋतूंचा एकत्रित पाऊस मोजला जातो आणि त्याची सरासरी ३५५ मि.मी. एवढी आहे. दि. १५ जून ते १५ जुलै हा खरीप हंगामाचा पेरणीचा काळ आहे. पण गेल्या ६६ वर्षात जून आणि जुलै महिन्यात सरासरी फक्त ११ ते १२ दिवसच पावसाने हजेरी लावली आहे. वर्ष-वर्ष पाण्यासाठी तहानलेच्या जमिनीची तहान या तुरळक पावसाने कधीही भागत नाही. मोठ्या पावसाचे प्रमाण नेहमी कमी असते. त्यामुळे ओढे, नाले न वाहिल्याने आणि पेरणी करण्याएवढी सुद्धा ओल न झाल्याने वर्षानुवर्षे खरीप हंगाम इथे यशस्वी झालेला नाही. ज्यावर्षी पेरणी झाली, त्यानंतर पावसात मोठा खंड पडल्याने उगवलेली पिके वाळून गेली. त्यामुळे इथला शेतकरी कधीही खरीप हंगामाचे पूर्ण क्षमतेने उत्पादन घेऊ शकला नाही.
१९५३ पासून २०१८ पर्यंत जून ते आॅक्टोबर या महिन्यात २००६ दिवस तालुक्याला पावसाने तोंड दाखविले आहे. म्हणजे सरासरी ३० ते ३१ दिवस पावसाने दरवर्षी या पाच महिन्यात हजेरी लावली. वाईट म्हणजे यामध्ये एक मि.मी. ते ५ मि.मी. पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत. या पावसाचा तापमान कमी करण्याशिवाय काहीच उपयोग होत नाही. या पावसाचा ना शेतीला, ना भूजल पातळी वाढण्याला कसलाही उपयोग होत नाही.३७ वर्षात मोठा पाऊस नाही!१९८१ मध्ये आटपाडीत ८२२ मि.मी. पाऊस झाला. त्यावर्षी दि. २२ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १६६ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर सलग ५ वर्षे दुष्काळ पडला. गेल्या ३७ वर्षात एका दिवशी तर नाहीच, पण एका वर्षातही एवढा सरासरी पाऊस झाला नाही. १९८१ पूर्वी १९६८ मध्ये ९२४, तर १९६२ मध्ये ८९६ मि.मी. पावसाची नोंद आहे. गेल्या ६६ वर्षात फक्त तीन वर्षे विक्रमी पाऊस झाला. उर्वरित पावसाळे कोरडेच.आटपाडी की जैसलमेर?देशात सर्वात कमी पाऊस राजस्थानातील जैसलमेर येथे वार्षिक सरासरी १२० मि.मी. एवढा पडतो. आटपाडी तालुक्याने अनेकवेळा जैसलमेरएवढा पाऊस अनुभवला आहे. १९७२ मध्ये तालुक्यात फक्त १० दिवस पाऊस आला. त्यावर्षी १६३ मि.मी. पावसाची नोंद झाली. २००२ मध्ये २७ दिवस पाऊस येऊनही खरसुंडीत ११७ मि.मी., तर तालुक्यात १७१ मि.मी., २००३ मध्ये खरसुंडीत १११ मि.मी., तर तालुक्यात १२३ मि.मी. आणि २०१८ मध्ये आटपाडीत १२५ मि.मी. पाऊस झाला.