कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी साडे नऊ पर्यंत कडेगाव १२.३७ टक्के इतके मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात मतदारांनी मतदान करण्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवला आहे. तर, दुपारी साडे तीन पर्यंत ६७ टक्के इतके मतदान झाले.
मंत्री विश्वजित कदम यांनी मतदान केंद्रावर भेट देत तेथील पाहणी देखील केली. तर सर्वच मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.कडेगाव नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी निवडणूक होणार होती. परंतु ऐनवेळी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने यामधील चार जागांच्या निवडणूक प्रक्रियेला निवडणूक आयोगाने तात्पुरती स्थगिती दिली होती.यानंतर ओबीसी आरक्षणाच्या जागा खुल्या करण्याचा निर्णय झाल्याने या ४ जागांची निवडणूक प्रक्रिया दि.१८ जानेवारी रोजी होणार आहे. तर उर्वरित १३ जागांची निवडणूक प्रक्रिया सध्या पार पडत असून या जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी सत्ता मिळवण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे.