सांगली : वीज दरवाढीच्या प्रश्नावर आता निर्णायक आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांची वाहने अडवून त्यांना घेराव घालण्याचे आवाहन राष्ट्रवादी नेते आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी शेतकरी व पक्षीय कार्यकर्त्यांना केले. वीजदरवाढीच्या प्रश्नावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतीपंपांच्या वीजदरात झालेल्या वाढीच्या निषेधार्थ मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन्ही कॉँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयापासून मोर्चास सुरुवात झाली. राम मंदिर चौक, कॉँग्रेस भवन, आझाद चौक, स्टेशन चौक, राजवाडा चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आला. यावेळी झालेल्या सभेत जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, केवळ मोर्चा काढून प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत वीजदरवाढ पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत सातत्याने आंदोलन करीत रहायला हवे. त्यासाठी शेतकरी, कार्यकर्ते आणि एरिगेशन फेडरेशनने जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांची वाहने अडवावीत. त्यांना घेराव घालून याप्रश्नी जाब विचारावा. तरच हा प्रश्न सुटणार आहे. सरकार या प्रश्नाकडे पाहायला तयार नाही. शेतकऱ्यांसाठी आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी हा निर्णय अत्यंत अन्यायकारक व घातक आहे. शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न मांडला की सरकारच्या पोटात गोळा येतो. त्यांना केवळ उद्योजकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. एकीकडे शेतीमालाचे दर कसे पडतील, याची व्यवस्था करायची आणि दुसरीकडे शेतीचा खर्च अधिक वाढवायचा, असा दुहेरी डाव आखून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास भाबडा शेतकरी फसला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर तूर लागवड केली. आता तूर खरेदी आणि आवश्यक भाव यांची जबाबदारी झिडकारली जात आहे. ग्रामीण भागातील उपसा सिंचन प्रकल्प बंद पाडून शेती आणि त्यावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्था सरकारला विस्कळीत करायची आहे. एकीकडे देशातील उद्योजकांना २ लाख ८० हजार कोटींची सवलत द्यायची आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ठेंगा दाखवायचा, असे दुटप्पी धोरण सरकार राबवित आहे, असे ते म्हणाले. यावेळी आ. सुमनताई पाटील म्हणाल्या की, सरकारने गेल्या काही दिवसांपासून शेती व शेतकरीविरोधी धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. वीजरदरवाढीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जाणार आहे. त्यामुळे तातडीने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम म्हणाले की, सत्तेवर आल्यापासून सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. ग्रामीण अर्थकारणाच्या नाड्या असलेल्या व्यवस्था त्यांना अडचणीत आणायच्या आहेत. केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील प्रत्येक गावागावात अशाप्रकारचे मोर्चे काढून सरकारला दरवाढ मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना केले. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळ््यातील विजेच्या प्रश्नाचा उल्लेख करताना, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात वेगळा नियम शिराळा तालुक्यात लावून येथील लोकांवर सरकार अन्याय करीत आहे, अशी टीका केली. माजी आमदार विलासराव शिंदे, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, एरिगेशन फेडरेशनचे जे. पी. पाटील, अरुण लाड आदींनीही मार्गदर्शन केले. यावेळी आ. मोहनराव कदम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, महापौर हारुण शिकलगार, पी. आर. पाटील, विशाल पाटील, सत्यजित देशमुख, माजी आमदार हाफिज धत्तुरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारले. (प्रतिनिधी)टेंभू, ताकारी, म्हैसाळचे बिलही वाढणारपुढील टप्प्यात टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ पाणी योजनांचे वीजबिलही वाढणार आहे. त्यामुळे योजनांच्या पट्ट्यातही शेती करणे मुश्कील होणार आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. मंत्र्यांना बंदी नको!मंत्र्यांची वाहने अडवून घेराव घालण्यापर्यंतचे आंदोलन परिणामकारक ठरू शकते. त्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी केली, तर ते यायचेच टाळतील, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
वीज दरवाढप्रश्नी मंत्र्यांची वाहने अडवा
By admin | Published: May 03, 2017 12:01 AM