सांगली : एखादा रास्त भाव दुकानदार धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्यास अथवा एखादे दुकान गैरसोयीचे असल्यास शासनाने सुविधा दिलेल्या रेशनकार्ड पोर्टेबिलिटीचा जिल्ह्यात प्रभावी वापर सुरू आहे. गेल्या वर्षांपासून सुरू झालेल्या या योजनेस शहरासह ग्रामीण भागातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानदारांच्या मनमानीला चाप बसला असून ग्राहकांना सेवाही चांगली मिळण्यास मदत होत आहे. केवळ एका महिन्यात ५०७३ जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार सर्व रेशनकार्ड धारकांना धान्य मिळावे व त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार केंद्र व राज्य शासनानेही अन्न वितरण व्यवस्थेत बदल केले आहेत. यापूर्वी एकाच दुकानदाराकडे नोंद झाल्यानंतर तिथूनच धान्य घ्यावे लागत होते. त्यात अनेकवेळा दुकानदाराच्या मनमानीलाही सामोरे जावे लागत होते, तर कधी कधी धान्य न मिळाल्याच्याही तक्रारी होत्या.
अनेकजण राहण्यास एका गावात व मूळ गावच्या पत्त्यावर रेशनकार्ड असते. असे अनेक ग्राहक धान्य घेणे बंद करतात. शासनाच्या पोर्टेबिलिटीच्या या सोयीमुळे कोणत्याही भागात धान्य मिळत असल्याने लाभार्थ्यांची संख्याही वाढत आहे.
चौकट
शहरात जास्त बदल
* ग्रामीण भागातून रोजीरोटीसाठी शहरात आलेल्या अनेकांना याचा लाभ होत आहे. कार्ड पोर्टेबिलिटीमुळे कुठेही धान्य घेता येत आहे.
* शहरात अनेकवेळा धान्य वितरण करताना अव्यवस्था दिसून येते. त्याला कंटाळलेले ग्राहकही या योजनेचा लाभ घेत आहेत.
* जिल्ह्यात वाळवा, तासगाव तालुक्यातही योजनेचा चांगला लाभ घेण्यात आला आहे.
चौकट
नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य
* कोरोना कालावधीमुळे रोजीरोटीची अडचण असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने मोफत धान्य योजना सुरू ठेवली आहे.
* केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतूनही येत्या नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळणार आहे.
* मोफत धान्य मिळणार असल्याने गोरगरीब व गरजू घटकाला दिलासा मिळाला आहे.
चौकट
तालुकानिहाय दुकानदार बदललेले ग्राहक...
आटपाडी ७१२
जत २६४
कडेगाव ५०५
कवठेमहांकाळ १३०
खानापूर १४६
मिरज ७११
पलूस ३६३
सांगली ३४६
शिराळा ५७८
तासगाव ४०६
वाळवा ९१२
जिल्ह्यातील एकूण कार्डधारक ४०८४९९
जणांनी दुकानदार बदलला ५०७३
जिल्ह्यातील एकूण कार्डसंख्या
प्राधान्य कुटुंब ३७४५०८
बीपीएल ६४९२८
अंत्योदय ३१३६५