सांगली : जिल्हा परिषदेतील एका सभापतींनी अधिकाऱ्यांना अरेरावी करून समिती सभेतच अपमानित केल्याचे शनिवारी उघडकीस आले. त्यांना उत्तर देण्यासाठी वेळही न देता प्रश्नांचा भडिमार करून तोंडसुख घेतले. शिवाय पैसे गोळा करून द्या, अन्यथा गैरकारभार उजेडात आणू, असा दमही एका अधिकाऱ्याला भरला. या त्रासाला कंटाळलेल्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या. जिल्हा परिषदेतील काही पदाधिकारी नेहमीच वादग्रस्त ठरत आले आहेत. एक विद्यमान सभापती शिक्षकांच्या बदल्यांवरून अधिकाऱ्यांना लक्ष्य करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या विषय समितीच्या सभेत या सभापतींनी अधिकाऱ्यांना एकेरी भाषा वापरली. यावरून अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली. कागदपत्रे दाखवून आपली चूक निदर्शनास आणून द्या. लोकप्रतिनिधी म्हणून काहीही आणि कसेही बोलायचे का, असा सवाल त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर अध्यक्षांनीही डोक्याला हात लावला. आपणही त्यांना सांगून थकलो असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले. दुसऱ्या एका अधिकाऱ्यांकडेही पैसे गोळा करू द्या, अशी मागणी केली आहे. पैसे गोळा करून द्या, अन्यथा गैरकारभार उजेडात आणू, असा दमही भरला. शेवटी या त्रासाला कंटाळलेल्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. सभापतींच्या या प्रतापाची जिल्हा परिषदेत शनिवारी जोरदार चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांना दम : चित्रीकरण कशासाठी? जिल्हा परिषदेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या विषय समितींच्या सभेत एका सभापतीने अचानक शिरकाव केला. त्यानंतर शिक्षकांच्या बदलीवरून एका अधिकाऱ्यास एकेरी शब्दात सभापतींनी दम देण्यास सुरुवात केली. याचवेळी सभापतींचे खासगी स्वीय सहायक या वादाचे मोबाईलवर चित्रीकरण करीत होते. याचे चित्रीकरण नक्की कशासाठी केले जात होते, असा प्रश्न समिती सभापती व सदस्यांनाही पडला आहे. याचा काहींनी शोध घेतला, तर बदलीमध्ये शिक्षकाचे काम झाले नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी सभापती महाशयांना जाब विचारला होता. शिक्षक व त्यांच्या नातेवाईकांना मी तुमच्या बदलीसाठी अधिकाऱ्यांना कसा दम दिला, हे दाखविण्यासाठी ते चित्रीकरण केले जात होते, असे अधिक चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सभापतींच्या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
सभापतींची अरेरावी; अधिकारी हतबल
By admin | Published: July 03, 2016 12:28 AM