लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेच्या राजकारणात प्रभाग ९ मधील निवडणूक नेहमी चर्चेची राहिली आहे. येथे विद्यमान नगरसेवक बाबासाहेब सूूर्यवंशी आणि माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्यात चुरशीची लढत होत असे. सुभाष सूर्यवंशी यांनी मागील निवडणूक लढवली नाही. आता या दोन ज्येष्ठांना थांबवून आगामी निवडणुकीत उतरण्यासाठी दोघांचे राजकीय वारसदार सरसावले आहेत.
विद्यमान नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी यांची राजकीय कारकीर्द तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधातच गाजली. पालिकेतील सभागृह गाजविणारे नेतृृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता त्यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने आगामी निवडणुकीत त्यांचे पुत्र राहुल रणांगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. बाबासाहेब सूर्यवंशी यांचे स्टार प्रचारक म्हणून त्यांचे पुतणे नरेंद्र सूर्यवंशी यांची मोठी साथ आतापर्यंत मिळाली आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांचे राजकीय वारसदार म्हणून नरेंद्र हेही राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
बाबासाहेब सूर्यवंशी यांच्याविरोधात नेहमी लढणारे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष सूर्यवंशी हेही आगामी निवडणुकीत उतरणार, असे बोलले जाते. त्यांचे पुत्र विशाल राष्ट्रवादीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमात आघाडीवर आहेत. राजकीय वारसदार म्हणून विशाल यांच्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्यासारखेच आहे. मात्र, सुभाष सूर्यवंशी यांचे स्टार प्रचारक म्हणून त्यांचे पुतणे रवी सूर्यवंशी यांनीही आतापर्यंत मोठे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे तेही त्यांचे राजकीय वारसदार होऊ शकतील.
अर्थात दोघेही ज्येष्ठ नेते आता राष्ट्रवादीतच असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची, याचे उत्तर जलसंपदामंत्री जयंत पाटील हेच ठरवणार आहेत.
चौकट
आता नाही, तर केव्हाच नाही..
रवी सूर्यवंशी आणि नरेंद्र सूर्यवंशी चाळिशीच्या पुढे गेले आहेत, त्यांना कधी संधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या दोघांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे आता नाही, तर येथून पुढे कधीच लढणार नाही, असा निर्णय या दोघांनी घेतल्याचे समजते.
फोटो -१४०१२०२१-आयएसएलएम-रवी सूर्यवंशी, नरेंद्र सूर्यवंशी जेपीजी (दोन सिंगल फोटो)