इस्लामपूर : बावची (ता. वाळवा) येथील पूर्वभाग सेवा सोसायटीमधील १ लाख २० हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी सोसायटीच्या अध्यक्षांसह दोन कर्मचाऱ्यांना दोषी धरून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रवीण कुंभोजकर यांनी दोघांना प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची तर एकाला न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा देताना ५०० रुपये दंड सुनावला.सक्तमजुरी व दंडाची शिक्षा झालेल्यात सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव आनंदराव पाटील यांच्यासह नागनाथ राजू कुंभार या कर्मचाऱ्याचा समावेश आहे, तर दुसरा कर्मचारी राजेंद्र भानुदास कोकाटे याला न्यायालय उठेपर्यतची शिक्षा व ५०० रुपयांचे दंड, अशी शिक्षा झाली. फिर्यादीतर्फे सरकारी वकील व्ही. एन. पाटील यांनी काम पाहिले. अपहाराची ही घटना एप्रिल २००२ ते मार्च २००३ या कालावधीत घडली होती.बावची पूर्वभाग सेवा सोसायटीत नागनाथ कुंभार व राजेंद्र कोकाटे खत विक्री विभागात काम करीत होते. त्यावेळी सर्जेराव पाटील अध्यक्ष होते. या सर्वांनी संगनमताने १ लाख १९ हजार ४९९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखा परीक्षणातून निष्पन्न झाले होते. त्यावेळी लेखापरीक्षक हरिश्चंद्र बंडू माने यांनी तिघांविरुध्द आष्टा पोलीस ठाण्यात अपहाराची फिर्याद दिली होती. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश प्रवीण कुंभोजकर यांच्यासमोर झाली. त्यामध्ये त्यांनी तिघांना दोषी धरून शिक्षा सुनावली. (वार्ताहर)
बावची येथील सोसायटी अध्यक्षांसह दोघांना शिक्षा
By admin | Published: July 19, 2014 11:19 PM