सांगली : जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्याची रणनीती महाविकास आघाडी आखत असतानाच, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर समर्थकांनी भाजपबरोबरच जाण्याची भूमिका घेतली आहे. रयत विकास आघाडीचे काही सदस्यही भाजपच्या गोटात असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. यामुळे भाजपच्या सत्तेला महाविकास आघाडी कसा सुुरुंग लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा परिषदेच्या रंगरंगोटीसह बांधकाम विभागाच्या साहित्य तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन बुधवारी झाले. यावेळी भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सदस्य आणि जिल्हा परिषद पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतिपदासाठी इच्छुक असणाऱ्या सदस्यांनीही हजेरी लावली होती. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या दालनात सर्वच पक्षाच्या सदस्यांनी हजेरी लावली होती.
यावेळी जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत चर्चा रंगली होती. खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येक सदस्यांनी शिवसेनेचे सदस्य आणि उपाध्यक्ष सुहास बाबर यांना पाठिंब्यासाठी फिल्डिंग लावल्याचे चित्र होते. बाबर यांनी मात्र स्मितहास्य करीत सर्वांनाच खूश ठेवले. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत नक्की ते काय भूमिका घेणार, यावर बरेच अवलंबून आहे.दरम्यान, बाबर गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आम्ही राष्ट्रवादीबरोबर कधीच जाणार नाही. नेत्यांनी सांगितले तरीही आम्ही तो आदेश पाळण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, असे सांगितले. रयत विकास आघाडीचा नायकवडी गटही महाविकास आघाडीबरोबर जाणार नसल्याचे दिसत आहे. महाडिक आणि सी. बी. पाटील गटाचे अजून काही ठरलेले नाही.
पण, शिवसेना आणि रयत विकास आघाडीचे काही सदस्य महाविकास आघाडीबरोबर आले नाहीत, तर त्यांचे गणित जमणे कठीण होणार आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे जिल्ह्यात भाजपच्या काही नेत्यांबरोबर जमत नाही; पण, राज्यपातळीवरून भाजपच्या नेत्यांचा आदेश आल्यास घोरपडेही भाजपच्या बाजूने झुकतील, असा अंदाजही काही सदस्यांनी व्यक्त केला आहे.