विकास शहाशिराळा : येथील कापरी निकम मळा येथे शेतात नांगरटीचे काम करत असताना १९ जिवंत नागाची पिल्ली व अंडी सापडली असून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे निसर्ग अधिवासात सोडून दिले. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर ही नागाची पिल्ली सापडल्याने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.शिराळा वनपरिक्षेत्रातील बिळाशी परिमंडळ अंतर्गत बिउर नियत क्षेत्रातील कापरी निकम मळा येथील शेतकरी शामराव निकम यांचे शेतात ३० जून रोजी नांगरणी दरम्यान नागाची १९ अडी आढळून आली होती. प्रा. सुशीलकुमार गायकवाड यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपाल सी.पी.देशमुख व वनरक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळावर पोहचून शहनिशा केली व अंडी ताब्यात घेतली. प्रा.सुशीलकुमार गायकवाड. सुजय गायकवाड यांचे मदतीने अंडी वनविभागाने निरिक्षणाखाली ठेवली होती.ही जिवंत नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आली आहे . सांगली वनविभाग उपवनसंरक्षक पी बी धानके , सहाय्यक वनसंरक्षक जी.एस.चव्हाण यांचे मार्गदर्शनात शिराळा वनक्षेत्रपाल सुशांत काळे, चंद्रकांत देशमुख, सचिन पाटील, बाबा गायकवाड, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, सुजय गायकवाड, विवेक शेटे, विशाल पाटील यांनी कार्यवाही केली.
नागपंचमीचे पार्श्वभूमीवर नागाची १९ अंडी वाचवून १९ जिवंत पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त केलेबददल प्रा.गायकवाड यांचा चमू तसेच शेतकरी निकम यांचे कौतुक होत आहे. या अगोदर अनेक जखमी, बोअरवेल मध्ये अडकलेल्या, विहिरीत अडकलेल्या अनेक नागांचे प्राण शिराळकरानी वाचवून नाग आमचा शत्रू नाहीतर दैवत आहे हे दाखवून दिले आहे. आजतर चक्क १९ पिलांना जीवदान दिले आहे.