सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत नदी उत्सव साजरा केला जाणार आहे. सांगलीत कृष्णेकाठीही शासकीय यंत्रणांनी समन्वयाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले.
नदी उत्सवाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी अतुल पाटील आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, शुक्रवारी व शनिवारी (दि. १७ व १८) घाटांची स्वच्छता केली जाईल.रविवारी व सोमवारी (दि. १९ व २०) देशभक्तीपर कार्यक्रम होतील. मंगळवारी (दि.२१) निसर्ग व पर्यावरण संबंधित कार्यक्रम होतील. बुधवारी व गुरुवारी (दि. २२ व २३) भक्ती व आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. जलसंपदा विभागाने स्वच्छता उपक्रमांचे आयोजन केले आहे. नदीकाठी दीपोत्सवही होणार आहे.