सांगली : विकास महाआघाडीच्या काळात मागासवर्गीय अनुशेषामधून भरती केलेल्या १४४ कर्मचाऱ्यांवर गंडांतर आले आहे. स्थायी समितीने गुरुवारी ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेत, मागासवर्गीय अनुशेष व रिक्त जागांची फेरप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले.स्थायी समितीची सभा सभापती संजय मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापालिकेत तत्कालीन विकास महाआघाडीच्या काळात मागासवर्गीय अनुशेष भरती प्रक्रिया राबविली होती. उमेदवारांच्या लेखी परीक्षा व मुलाखती घेऊन १४४ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रियेत खेळाडूंचे आरक्षण नसल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने या भरती प्रक्रियेस स्थगिती दिली होती. २०१४ मध्ये ही स्थगिती उठविली होती. या काळात महासभेने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा ठराव केला होता. त्यामुळे स्थायी समितीने ही भरती प्रक्रिया रद्द करून फेरभरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. शिवाय महापालिकेत अनेक खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा व मागासवर्गीय अनुशेषाची एकत्रित फेरभरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश सभापती संजय मेंढे यांनी अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या विविध विभागातील ६३५ कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर महापालिकेत गेल्या सात वर्षांपासून चालक ८ हजार रुपये मानधनावर काम करतात. त्या चालकांनी मानधनवाढ करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच कबड्डी खेळाडू कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचाही निर्णय झाला. प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी सभेला गैरहजर असल्याचा मुद्दा सदस्य विजय घाडगे यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती मेंढे यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)न्यायप्रविष्ट बाबउमेदवारांच्या लेखी परीक्षा व मुलाखती घेऊन १४४ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रियेत खेळाडूंचे आरक्षण नसल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने स्थगिती दिली होती.
मागासवर्गीय अनुशेष भरती रद्द
By admin | Published: June 25, 2015 10:48 PM