शिरटे : बहे (ता. वाळवा) येथील प्रसिध्द तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असलेल्या रामलिंग बेटावर या महिन्यात साजरे होणारे रामनवमी व हनुमान जयंती उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच छायाताई पाटील व उपसरपंच प्रा. सुवर्णाताई पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बुधवार दि. २१ एप्रिलचा श्रीराम नवमी उत्सव व मंगळवार दि. २७ एप्रिलचा श्री हनुमान जयंती उत्सव रद्द करावा लागत आहे. दोन्ही उत्सवात स्थानिक पुजारी स्वत:ची काळजी घेत पूजाअर्चा, धार्मिक विधी पार पाडतील व त्यानंतर मंदिराला कुलूप घालतील. दोन्ही उत्सवावेळी भाविकांनी रामलिंग बेटावर दर्शनासाठी जाऊ नये किंवा आग्रह करू नये, असे आवाहन सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामसेवक यांनी केले आहे.